राजीव सातव यांचे निधन; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त, राहुल गांधी म्हणाले – ‘मित्र गमवला’

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे रविवारी (दि. 16) पहाटे पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. तरुण नेता गमावल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. तर काँग्रेस नेते, माजी खासदार राहुल गांधी यांच्यासह उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देखील ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

 

 

 

 

 

 

पंतप्रधान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राजीव सातव हे तरुण नेते होते. पुढे जाऊन मोठी जबाबदारी सांभाळण्याची त्यांची क्षमता होती. त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांबद्दल संवेदना व्यक्त करतो, असे मोदी यांनी म्हटले आहे. तसेच राहुल गांधीनी देखील सातव यांना श्रध्दांजली वाहिली आहे. मी माझा मित्र गमावला आहे. खुप दुःख झाले आहे. सातव हे अतिशय हुशार, उमदे आणि उच्च क्षमता असलेले नेते होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. सातव यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही शोक व्यक्त केला आहे. राजीव सातव हे राज्यसभेचे उत्तम सदस्य होते. लोकसेवेसाठी ते कटिबद्ध होते. त्यांच्या निधनाने दुःख झाल्याचे ट्विट नायडू यांनी केले आहे.