सुप्रिया सुळेंनी केलं ’या’ भाजप खासदाराचं ‘कौतुक’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचे सर्व पक्षात मित्र आहेत. तसेच चांगल्या कामाचे कौतूक करण्यासही ते मागेपुढे पाहात नाहीत, मग तो राजकीय नेता कुठल्याही पक्षाचा असला तरीसुद्धा ते कौतूक करतात. असाचा अनुभव त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडून सुद्धा नेहमी येत असतो. खासदार सुप्रिया सुळे यांनी आता भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नूषा आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांचे तोंडभरून कौतूक केले आहे. रक्षा खडसे माझ्या आवडत्या खासदार आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे कौतूक केल्याने राजकीय क्षेत्रात मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जळगावमधील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशाळा तसेच उद्योजकता विकास मंचाने ‘उड्डान : संजीवनी नव – उद्योजकांसाठी’ परिसंवाद आयोजित केला होता. यावेळी सुप्रिया सुळे यांनी खासदार रक्षा खडसे यांचे कौतूक केले. या परिसंवादात सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आले की, दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार्‍या 48 खासदारांपैकी तुमचे आवडते खासदार कोण ? यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता भाजपा खासदार रक्षा खडसे, असे उत्तर दिले. शिवाय, याचे कारणेही त्यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रातील 48 खासदारांमध्ये सुसंस्कृत आणि अभ्यासू असलेल्या रक्षा खडसे माझ्या आवडत्या महिला खासदार आहेत. धडपड करणारे नेतृत्त्व म्हणून मला त्यांचे कौतुक वाटते. यावेळी सुळे यांनी विद्यार्थींनींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षही उपस्थित होते.