मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकार चालविण्याचा अधिकार नाही : रामदास आठवले

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहिना 100 कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबवर सिंग यांनी केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकारला यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने चारही बाजूने घेरले आहे. दरम्यान, आता रिपाइं नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता सरकार चालविण्याचा अधिकार राहिलेला नाही.

याप्रकरणी रामदास आठवले यांनी एक ट्विट केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सरकार चालविण्याचा अधिकार राहिलेला नाही.

असा प्रकार देशात कधीच कुठे घडला नाही
आठवले यांनी म्हटले आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. ते आरोप गृहमंत्र्यांनी नाकारले आहेत. मात्र असा प्रकार देशात कधीच कुठे घडला नाही. या गंभीर आरोपांची सखोल चौकशी व्हावी. या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या लौकीकावर कलंक लागला आहे, असे आठवले यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासला – राज ठाकरे
परमबीर सिंग लेटर प्रकरणी भाजपा आक्रमक झालेली असताना आता मनसेने सुद्धा राज्य सरकारला धारेवर धरले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली आहे. ठाकरे यांनी म्हटले आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.