राज ठाकरेंनी केलेले ‘ते’ वक्तव्य म्हणजे ‘बालिशपणा’चे लक्षण : रामदास आठवले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामामधील हल्ल्यामांगे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरले होते. त्यावरून आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. राज ठाकरेंसारखा राष्ट्रवादी नेता, उत्तर भारतीयांबद्दल त्यांचे काही मतभेद असतील, पण राष्ट्रवादी भूमिका ठेवणाऱ्या राज ठाकरेंनी केलेले ते विधान बालिशपणाचे आहे, अशी टीका आठवले यांनी केली आहे.

जैश ए मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनेने पुलवामा हल्ला घडवून आणला आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. मात्र, मोदींनीच हा हल्ला घडवल्याचं सांगणं हे अतिशय बालिशपणाचं लक्षण आहे. आता, एअर स्ट्राईक करुन बदला घेतला, पण विरोधक म्हणातायेत की निवडणुकांच्या उद्देशाने हा स्ट्राईक केला आहे. जर बदला घेतला नसता, तर म्हटले असते या सरकारने काहीच केले नाही. मला वाटतं एअर स्ट्राईकवरुन राजकारण करू नये, असं आठवलेंनी यावेळी म्हटलं.

निवडणुकांचा फायदा घेण्यासाठी हा एअर स्ट्राईक केला नाही. पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी हा स्ट्राईक केला होता. पण, अप्रत्यक्षपणे याचा आम्हाला फायदा होणारचं, आता फायदा होणार तर आम्ही काय करणार, राजकारणात तोटा होण्यासाठी थोडंच आहोत, असेही आठवले म्हणाले.

दरम्यान, पुलवामा हल्ल्यातील शहीद हे राजकीय बळी आहेत, असं राज ठाकरेंनी वक्तव्य केलं होते. कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे व्यक्तव्य केले होते. त्यावर आठलेंनी त्यांचा समाचार घेतला आहे.