Corona Virus : इराणचे आरोग्य मंत्री देखील ‘कोरोना’च्या विळख्यात, गंभीर झाली ‘महामारी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत अजूनही कायम आहे. आता या व्हायरसची लागण इराणचे उप आरोग्यमंत्री आणि खासदार यांनाही झाली आहे. दरम्यान, इराण हा कोरोना विषाणूचा नवीन ठिकाणा बनला असून आतापर्यंत तिथे यामुळे 15 लोकांचा मृत्यू झाला आहे.  इराणमध्ये सध्या कोरोना विषाणूची 95 प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

इराण हा चीनबाहेर कोरोना विषाणूच्या साथीने त्रस्त झालेल्या तीन देशांपैकी एक आहे. इराणचे डेप्युटी मिनिस्टर इराज हैरीरची यांनी सोमवारी कोरोना विषाणूचा आकडा लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप फेटाळून लावला. दरम्यान, पत्रकारांशी बोलतानाही ते आजारी दिसत होते.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की चीनच्या बाहेरील देशांमध्ये कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे चिंताजनक आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी मंगळवारी सांगितले की, वॉशिंग्टन चिंतीत आहे की इराणने कोरोना विषाणूचे खरे परिणाम लपविण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना विषाणूबद्दल सत्य सांगण्याचे आवाहन अमेरिकेने सर्व देशांना केले आहे.