28 वर्षाच्या अंबा प्रसाद यांचं जीवन ‘संघर्ष’मय, ‘वकील’ ते ‘आमदार’ आणि आता ‘मंत्री’ !

रांची : वृत्तसंस्था – हजारीबागच्या बडकागाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या 28 वर्षीय महिला उमेदवार अंबा प्रसाद यांनी निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. अंबा प्रसाद झारखंड विधानसभा निवडणूकीतील अशा एकमेव उमेदवार आहेत, ज्या अविवाहित असून सर्वात कमी वयाच्या उमेवार आहेत. अंबा यांनी या निवडणूकीत आजसूचे रोशनलाल चौधरी यांचा 30,140 मतांनी पराभव केला आहे. त्या हेमंत सोरेन मंत्रिमंडळात काँग्रेसच्या कोट्यामधून मंत्री होऊ शकतात, असे म्हटले जात आहे.

UPSC चा अभ्यास सोडून झाल्या MLA

बडकागाव विधानसभा मतदार संघातून यापूर्वी अंबा प्रसाद यांचे वडील योगेंद्र साहू 2009 मध्ये आणि आई निर्मला देवी यांनी 2014 मध्ये निवडणूक जिंकली होती. परंतु, कफन सत्याग्रहादरम्यान त्यांच्या आई-वडिलांना जेलमध्ये पाठविण्यात आल्याने अंबा प्रसाद दिल्लीतील युपीएससीचा अभ्यास सोडून घरी परतल्या. घरी आल्यानंतर त्यांनी हजारीबाग न्यायालयात वकीली सुरू केली. आई-वडील आणि भावावरील खटला त्याच पाहू लागल्या.

बडकागावमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकणार्‍या अंबा प्रसाद यांचे वडील योगेंद्र साहू, आई निर्मला देवी आणि भावावर सध्या कफन सत्याग्रहावरून खटला सुरू आहे. सध्या त्यांचे वडील जेलमध्ये तर आई बदरमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच अंबा यांनी संघर्ष करून भावाची जेलमधून सुटका करून घेतली. परंतु, वडीलांसाठी त्यांचा संघर्ष अजूनही सुरू आहे. अंबा यांनी ही निवडणूक जिंकून आपल्या आई-वडीलांचा राजकीय वारसा जपला आहे. अंबा म्हणतात, मी कधी विचारही केला नव्हता की, मी आमदार होईन. परंतु, आई-वडीलांवर राजकीय सुडातून झालेल्या कारवाईनंतर आई-वडीलांचे अर्धवट राहिलेले कार्य पूर्ण करणार, अशी शपथ मी घेतली होती.

आई-वडील आणि भावावर खटला

एका मुलाखतीत अंबा यांनी सांगितले की, माझ्या संपूर्ण कुटुंबाला कफन सत्याग्रह आंदोलनात अडकविण्यात आले. मी 2014 मध्ये बीआयटीमधून बीबीए केले होते. मी विनोबा भावे विद्यापीठातून वकीलीची पदवीही घेतली आहे. माझ्या वडीलांवर राजकीय आरोप करण्यात आले आणि त्यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र रचण्यात आले. कुटुंबावर असे संकट आल्यानंतर मी दिल्लीतून घरी परत आले. नंतर मी हजारीबाग न्यायालयात वकीली सुरू केली. बडकागावमध्ये पाणी, जंगल आणि जमीनीसाठी आंदोलन सुरू आहे.

अंबा म्हणाल्या, वडीलांच्या सुटकेसाठी मी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. मी त्यांना विनंती केली की, त्यांनी मला चांगला वकील द्यावा. यावेळी मी कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि सलमान खुर्शीद यांनाही भेटले. अहमद पटेल यांनी या कामासाठी मला खुप मदत केली. राहुल गांधी यांना जेव्हा माझ्या वडीलांबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी दिल्लीत मला कायदेविषयक मदत उपलब्ध करून दिली. तसेच काँग्रेस पक्षासाठी काम करण्यास सांगितले. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांचेही मला समर्थन मिळाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हजारीबाग जागेसाठी माझ्या नावावर चर्चाही झाली. परंतु, शेवटच्या क्षणी माझे नाव आले नाही. परंतु, विधानसभा निवडणुकीत मला बडकागावमधून उमेदवारी मिळाली.