मागितले ‘रेशन’ मिळाला दांडक्याने ‘मार’, बीडमध्ये दोन गटात ‘हाणामारी’ (व्हिडिओ)

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांना घरात बसून राहावे लागत आहे. अशातच हाताला काम नसल्याने सरकारकडून गोर गरीब कुटुंबांना स्वस्त धान्य देण्यात येत आहे. मात्र, बीडमध्ये स्वस्त धान्य दुकानदाराकडे रेशन मागण्यासाठी गेलेल्या दोन कुटुंबांना दुकानदार आणि त्याच्या परिवाराकडून काठी आणि दगडाने मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा मारहाणीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2853882994648925&id=148479338522651

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील नांदलगाव येथील ही घटना आहे. या गावातील स्वस्त धान्य दुकानदार सुनील राऊत यांच्याकडे रेशनची मागणी होत होती. अनेक वेळा चकरा मारून देखील रेशन न मिळाल्याने विष्णू गाडे, प्रभू गाडे या दोन भावंडांनी जाब विचारला. आपल्याला सारखा जाब विचारत असल्याच्या रागातून स्वस्त धान्य दुकानदाराने दोन्ही भावंडावर हल्ला केला.

दुकानदाराने लाकडी काठ्याने या दोन्ही भावांना मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनीही या दुकानदारावर हल्ला चढवला. यावेळी दुकानदाराचे कुटुंब आणि नागरिकांमध्ये भरस्त्यावर फ्री स्टाईल हाणामारी झाली. दरम्यान स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र, अद्याप मुजोर दुकानदारावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.