तुपकर – पवारांची भेट ; स्वाभिमानीच्या दिलजमाईची शक्यता ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या अशा लगीन घाईत आज शरद पवार आणि स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांच्यात मुंबईत बैठक पार पडली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीत स्वाभिमानीला सामावून घेण्यासाठी शरद पवार आग्रही आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माढ्यात २७ फेब्रुवारी रोजी स्वबळाचा एल्गार पुकारण्याची तयारी सुरु असतानाच शरद पवार स्वाभिमानीला आघाडीत समाविष्ट करून घेण्यास सक्रिय झाले आहेत. कोल्हापुरात मागील आठवड्यात स्वाभिमानीने गुप्त बैठक घेऊन स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. २७ तारखेला माढ्यात स्वबळाचा एल्गार पुकारल्या नंतर २८ फेब्रुवारीला स्वाभिमानीची पुण्यात कार्यकारीणी बैठक पार पडणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे. या सर्व घडामोडींना सुरुवात होण्या अगोदर शरद पवार स्वाभिमानीला आघाडीत खेचण्याचा प्रयत्न करत आहेत.

शरद पवार आणि रविकांत तुपकर यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली या बद्दल कसलीच माहिती मिळाली नसली तरी हातकणंगलेसह बुलढाणा आणि वर्धाच्या जागांसाठी स्वाभिमानी आग्रही राहण्याची शक्यता आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्वबळाचा माढ्यात शरद पवार यांच्या उमेदवारीला देखील फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणून शरद पवार स्वाभिमानीला आघाडीत खेचण्यात आग्रही आहेत असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.