CBI च्या छाप्यात रेल्वेच्या मुख्य अभियंत्याच्या घरी सापडले ‘घबाड’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीआयने बुधवारी देशव्यापी छापे मारले. त्यात बिहारमधील एका रेल्वेच्या मुख्य अभियंत्याच्या घरी मोठे घबाड हाती लागले आहे. सीबीआयने टाकलेल्या छाप्यात त्याच्याकडे १८३ टक्के अधिक कमाई आढळून आली आहे. एकप्रकारे तो काळ्या धनाचा कुबेर होता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

बुधवारी सीबीआयने भ्रष्ट अधिकाऱ्यावर करण्यात आलेल्या कारवाईत पूर्व मध्य रेल्वे, हाजीपूरचे मुख्य इंजिनिअर रवीश कुमार यांच्या घरावर धाड मारली. त्यात त्यांच्याकडे १८३ टक्के अधिकची संपत्ती सापडली. त्याचसोबत रवीश कुमार यांच्या पटना येथील घर आणि सासरवाडीवरसुद्धा छापे मारले असून, बिहार शरीफ येथील वडिलोपार्जित घराजवळही सीबीआय गेली होती.

या छाप्यात ७६ लाख रुपये रोख रक्कम, जमीन घर आदींचे १५ कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागले आहेत. तद्वत, ५० लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या दोन घरातून ही रक्कम सापडली आहे. त्यांचे सासरे कामगार आयुक्त पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात रक्कम आढळून आली आहे.

पटना ते दिल्ली – एनसीआरमध्ये फ्लॅट
रवीश कुमार यांच्या घरी मारलेल्या छाप्यात सीबीआयला दोन फ्लॅट आणि फ्लॅट खरेदी समोर आली आहे. पटनाच्या राजाबाजारासह उत्तर प्रदेश येथील नोएडामध्येही फ्लॅट आहेत. तर सोनापूर आणि खगौलमध्ये काही जमिनी मिळाल्या आहेत. रवीश कुमार यांनी २००९ ते २०२० या काळात नातेवाईकांच्या नावे मोठी संपत्ती जमा केली. त्यांचा पगार आणि अन्य उत्पन्न मिळून १ कोटी रुपये होते, तर त्यांच्या पत्नीचे ४० लाख रुपये उत्पन्न होते.

सीबीआयने सांगितल्यानुसार, त्यांचा खर्च ६७.४१ लाख रुपये आहे. त्यानुसार त्यांची बचत ७६.५९ लाख रुपये व्हायला पाहिजे होती. याच्या तुलनेत त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या नावावर त्यांनी ३.४० कोटी रुपयांची मालमत्ता जमा केली आहे. शिलकीपेक्षा रोख रक्कम अधिक सापडलेली आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.