लॉकडाउन कालावधीत महाराष्ट्रात अन्न महामंडळाचा विक्रमी पुरवठा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारतीय अन्न महामंडळामार्फत (एफसीआय) होणारा अन्नपुरवठा महाराष्ट्रात विक्रमी टप्प्यावर पोहोचला आहे. टाळेबंदीच्या कालावधीत 7 मे 2020 पर्यंत महाराष्ट्रात अतिरिक्त 5.62 लाख मेट्रिक टन तांदूळ आणि 3.88 लाख मेट्रिक टन गव्हाचा पुरवठा महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत महामंडळातर्फे राज्यात 4.33 लाख मेट्रिक टन तांदळाचा पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डी. व्ही. प्रसाद यांनी दिली.

केंद्र सरकारच्या योजनेनुसार प्रति लाभार्थी, प्रति माह 5 किलो अन्न मोफत दिले जात आहे. तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार येणार्‍या कुटुंबांना एप्रिल, मे आणि जून 2020 मध्ये त्यांना मिळणार्‍या धान्याच्या दुप्प्ट धान्य मिळणार आहे. राज्यासाठी निश्चित असलेल्या अन्न साठ्यापैकी महाराष्ट्रात एप्रिल 2020 मध्ये पूर्ण तर मेमध्ये 25 टक्के अन्न उपलब्ध झाले आहे.

नियमित राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि अन्य समाजोपयोगी योजनां व्यतिरिक्त कोविड-19 पार्श्वभूमीवर केंद्र सरकारद्वारे जाहीर केलेल्या विशेष योजनांकरिता विविध राज्यांची अन्नाची मागणी पूर्ण करण्याकरिता मार्च 2021 पर्यंत महामंडळाकडे पुरेसा साठा असल्याचा दावाही प्रसाद यांनी केला. देशव्यापी टाळेबंदीमुळे अनेक भागांत माल वाहतूक विस्कळीत असली तरी सध्याच्या रब्बी मोसमात अन्नात वाढ होत असल्याचेही ते म्हणाले. गव्हाच्या निश्चित 400 लाख मेट्रिक टन उत्पादन तुलनेत 6 मे 2020 पर्यंत 216 लाख मेट्रिक टन पुरवठा होत असल्याचेही त्यांनी सांगितले.