पुण्यात नायजेरियन युवकाकडून तब्बल 35 लाखांचे कोकेन जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात एका नायजेरियन नागरिकाला अटक करून त्याच्याकडून 34 लाख रुपये किंमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.20) पुणे-कात्रज सासवड बायपास रोडवरील हांडेवाडी येथील विद्या प्रबोधिनी नॅशनल स्कुलच्या कमानीजवळ करण्यात आली.

या कारवाईत पोलिसांनी व्हॅलंन्टाईन उर्फ जेम्स अमुचे ईझेजा (वय-28 रा. हांडेवाडी, मुळ रा. ईन्युगु, नायजेरिया) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उप निरिक्षक हेमंत अशोक ढोले (वय-34) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हांडेवाडी येथील विद्या प्रबोधिनी नॅशनल स्कुलच्या समोरील सार्वजनिक रोडवर अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता 34 लाख 2 हजार 800 रुपयांचे 340 ग्रॅम 280 मिलीग्रॅम वजनाचे कोकेन हा अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी कोकेन आणि त्याच्या ताब्यातील दुचाकी, मोबाईल रोख रक्कम असा एकूण 35 लाख 2 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.