राज्यातील मंदिरे आणि जीम सुरू करण्याबाबत संजय राऊत यांचं सूचक विधान, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मंदिरं आणि जीम सुरु करण्याबाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यातील मंदिरे आणि जीम सुरु करण्याबाबत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो, असे संजय राऊत यांनी आज (गुरुवार) स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सप्टेंबरपासून राज्यातील जनजीवन सामान्य होण्याची चिन्ह दिसत आहेत.

खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. राज्यातील धार्मिक स्थळं आणि जीम सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच भाष्य केलं आहे. माझ्या अकलनानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात धार्मिक स्थळं आणि जीम सुर करण्याबाबत निर्णय होऊ शकतो. याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असेही राऊत यांनी सांगितले. त्यामुळे गणेश विसर्जनानंतर राज्यातील धार्मिक स्थळं सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, राज्यातील धार्मिक स्थळे सुरु करावीत या मागणीसाठी राज्यातील विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या समित्यांच्या प्रमुखांची नुकतीच एक बैठक पार पडली. आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या पुढाकाराने व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे ही बैठक पार पडली. यावेळी येत्या शनिवारी 29 ऑगस्ट रोजी राज्यभर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. ‘दार उघडा उद्धवा, दार उघड’ आशी आरोळी देत हे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही या आघाडीने स्पष्ट केलं आहे. यावेळी शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, माजी अध्यक्ष अतुल भोसले, श्रीसिद्धिविनायक मंदिर समितीचे विश्वस्त सुमंत घैसास यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.