भाजप नेत्याचा रोहित पवारांवर निशाणा, म्हणाले – ‘बारामतीला Remdesivir सहज मिळतात, मग जामखेडला का नाही?’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेडचा तुटवडा जाणवत आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आता कर्जत-जामखेड मतदारसंघात जाणवत असलेल्या रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरून भाजप नेते, माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन बारामतीमध्ये सहज मिळते, मात्र जामखेडमध्ये ते मिळत नाही. येथील रुग्णांची हेळसांड होण्यास येथील लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.

प्रा. शिंदे यांनी नुकतेच ठिकठिकाणी भेटी देत कर्जत-जामखेडमधील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, या मतदारसंघातील कोरोनाची परिस्थितीत गंभीर बनली आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक आहेत. मात्र, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. जे इंजेक्शन बारामतीत मिळते ते जामखेडमध्ये का नाही? इंजेक्शन मिळत नसल्याने कित्येक रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. याला जबाबदार येथील लोकप्रतिनिधी व राज्य सरकार हेच आहेत. त्यांची ही जबबादारी असूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनात समन्वय ठेवून या सुविधा मिळवून द्याव्यात. रुग्णांचे, मृत्यूचे नेमके आकडे, उपाययोजनांची परिस्थिती याची माहिती दिली जात नाही. याचा अर्थ काही तरी लपवाछपवी सुरू असल्याचा संशय येतो, असे शिंदे म्हणाले. तसेच जामखेडमधील आरोळे प्रकल्पातील कोविड केअर सेंटरची राज्यभर चर्चा सुरू आहे. ग्रामीण रुग्णालय आणि केंद्र व राज्य सरकारच्या मदतीवर चालणाऱ्या डॉ. आरोळे कोविड केअर सेंटरच्या बाहेर एकट्या आमदाराचे फोटो कसे? असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे . स्वत:चा फोटो लावायचा होता तर जामखेडला स्वखर्चाने कोविड सेंटर उभारायचे होते, असा टोलाही शिंदे यांनी लगावला आहे.