‘गृह कर्जा’वर तुम्ही करू शकता लाखों रुपयांची ‘बचत’, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलीकडेच सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांनी (PSB’s) रेपो रेट लिंक्ड होम लोन सादर केले आहेत. या योजनेअंतर्गत फ्लोटिंग होम लोनचा व्याज दर ‘मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेन्डिंग रेट’ (MCLR) ऐवजी रेपो रेटला जोडला गेला आहे. एमसीएलआरमध्ये ग्राहकांना कमी व्याजदराचा लाभ मिळतो. भारतीय रिझर्व्ह बँक इतर व्यावसायिक बँकांना कर्ज देते त्या दरात रेपो रेट (Repo rate) असतो. सामान्यत: रेपो दराशी संबंधित गृह कर्जावर आरबीआयद्वारे पॉलिसी व्याजदरामधील बदलाचा फायदा त्वरित उपलब्ध होतो. कोरोना विषाणू साथीच्या काळात अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आरबीआयने गेल्या काही महिन्यांत रेपो दरात मोठी कपात केली आहे. यामुळेच रेपो दरांशी जोडले गेलेले गृहकर्ज देखील याच क्रमात स्वस्त झाले आहेत. त्याच वेळी, एमसीएलआर लिंक्ड होम लोन दर तुलनेत महाग आहेत.

रेपो रेट लिंक्ड होम लोनमध्ये शिफ्ट कशासाठी ?
एमसीएलआरच्या तुलनेत रेपो रेटमध्ये असे अनेक घटक आहेत जे गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी (Repo Rate Linked Home Loan) यास आकर्षक बनवतात. एमसीएलआरच्या बाबतीत सर्वात मोठा घटक म्हणजे फक्त ठेवीची किंमत. आजच्या काळात रेपो रेटशी संबंधित गृह कर्जे सर्वात स्वस्त आहेत. म्हणूनच तज्ञ देखील कर्जदारांना रेपो रेट लिंक्डमध्ये जाण्याचा सल्ला देतात. आजचा रेपो रेट लिंक्ड होम लोन रेट 7 टक्क्यांपेक्षा खाली आहे तर बेस रेट आणि एमसीएलआर लिंक्ड रेट्स 7.50 टक्के किंवा त्याहून अधिक आहेत. अशा परिस्थितीत आपले जुने कर्ज रेपो रेट लिंक्ड कर्जात रिफायनान्स करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामुळे कर्जाच्या संपूर्ण कालावधीत लाखो रुपयांची बचत होऊ शकते. लाखो रुपयांची ही बचत कशी होईल त्याबाबत जाणून घेऊया.

लाखो रुपये वाचवण्याचे गणित काय आहे ?
समजा एखाद्या व्यक्तीने 8.2 टक्के दराने एमसीएलआर लिंक्ड गृह कर्ज घेतले आहे. या कर्जावर 180 महिन्यांत 25 लाख रुपयांचे पेमेंट बाकी आहे. जर या व्याजदरामध्ये कोणताही बदल झाला नाही तर एकूण व्याज सुमारे 18.52 लाख रुपये असेल. त्याची ईएमआय 24,180 रुपये असेल. जर यास 7.1 टक्क्यांच्या व्याज दराने रेपो लिंक्ड कर्जात रुपांतर केले जाते तर या 180 महिन्यांकरिता एकूण व्याज सुमारे 15.69 लाख रुपये असेल. अशा प्रकारे रेपो लिंक्ड कर्जावर 2.83 लाख रुपयांची बचत होईल. यामुळे त्यांना दरमहा 1,570 रुपये कमी ईएमआय द्यावा लागेल, जो की 22,610 रुपये असेल.

याव्यतिरिक्त, जर कर्जदाराने रिफायनान्स केलेल्या कर्जावर पूर्वीसारखे दरमहा 24,180 रुपये ईएमआय जमा करणे चालू ठेवले तर कर्जाचा कालावधी कमी होऊन केवळ 161 महिन्यांपर्यंत जाईल. यामुळे व्याजावर अतिरिक्त 1.92 लाख रुपयांची बचत होऊ शकते. आरबीआयने बँकांना कोणत्याही अतिरिक्त फरकाशिवाय कर्ज हस्तांतरित करण्यास परवानगी देण्यास सांगितले आहे. तथापि, एका कर्जातून दुसर्‍या कर्जात बदलण्यासाठी जमाकर्त्यास काही रूपांतर शुल्क भरावे लागेल. हे बँकेच्या स्वतःच्या धोरणावर अवलंबून असेल.