ज्योतिरादित्य शिेंदेंवर काँग्रेसचा ‘गंभीर’ आरोप, म्हणाले – ‘राजीनामा नव्हे तर हकालपट्टी केली’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मध्यप्रदेशात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. आज ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट केला.

काँग्रेसने लगेचच खेळी करत हे पत्र न स्वीकारताच काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल यांनी जाहीर केले की सिंधिया यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे असे स्पष्ट केले. दरम्यान सोनिया गांधींनी देखील यावर मंजूरी दिली आहे. तसेच तात्काळ प्रभावाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

मध्यप्रदेशातील सिंधिया गटाचे जवळपास १७ आमदार हे सोमवारी विमानाने बेंगळुरूला गेले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले होते. यामुळे कमलनाथ सरकारमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले. दरम्यान मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपला दिल्लीचा दौरा देखील मध्येच थांबवून तातडीने बैठक घेतली होती. तसेच कमलनाथ यांनी २६ पैकी २२ मंत्र्यांचे राजीनामे घेत नव्याने मंत्रीमंडळ स्थापन करण्याची खेळी खेळली होती.

बेंगळुरूला गेलेल्या या सिंधिया गटाच्या १७ आमदारांपैकी ६ आमदार हे कमलनाथ सरकारमध्ये मंत्री पदावर आहेत. आज सिंधिया यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून त्यांनी थेट दिल्लीतील निवासस्थान गाठले आहे. तसेच सोनिया गांधींना ९ मार्चच्या तारखेचे राजीनामा पत्र देखील ट्विटरवर पोस्ट केले. सध्याला सिंधिया यांच्या गटातील १९ काँग्रेस आमदारांनी राजीनामे पाठविले असून या आमदारांना बेंगळुरुतील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे.