कोरोनाच्या संकटात अमेरिकेसह 55 देशांना भारत पाठवतोय ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’, यादीत ‘पाकिस्तान’चं नाव नाही

पोलिसनामा ऑनलाईन – जगभरात कोरोना व्हायरसने हैदोस घातला असून दिवसेंदिवस बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.  अशातच  भारतही अनेक देशांच्या मदतीला धावून गेला आहे. अमेरिकेसह 55 देशांना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. जगातील अन्य देशांप्रमाणे भारताचीही कोरोना व्हायरसच्या संकटाशी झुंज सुरु आहे. भारतासमोरही या आजाराने मोठे आव्हान निर्माण केले आहे. पण या संकटकाळात भारत स्वत: बरोबर इतर देशांचीही मदत करुन माणुसकीच्या धर्माचे पालन करीत आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारने ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, नेपाळ, मलादिव, श्रीलंका, म्यानमार, ओमान, संयुक्त अरब अमिराती, सेशेल्स, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, डॉमनिकन रिपब्लिक, युगांडा, इजिप्त, सेनेगल, अल्जेरिया, जमैका, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, युक्रेन, नेदरलँड, स्लोवानिया, उरुग्वे, इक्वाडोर देशांचा समावेश आहे. दरम्यान, यादीत ‘पाकिस्तान’चं नाव नाही.

यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाविरुद्ध लढ्यात भारताकडे मदतीची विनंती केली होती. तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये 25 मार्च रोजी चर्चा होउन रशियाला दोन औषधांचा पुरवठा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही भारताने दिली होती.

आखाती देशांवर विशेषकरुन संयुक्त अरब अमिरातीवर भारताचे विशेष लक्ष आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव हर्ष श्रिंगला हे आखाती देशांच्या संपर्कामध्ये आहेत. बहरीनला सुद्धा गोळया पाठवण्यात आल्या आहेत. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध करोना व्हायरसवर सर्वाधिक प्रभावी ठरत असल्याने जगभरातून या औषधाला मोठया प्रमाणावर मागणी  होत आहे.भारत सरकारने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली होती. देशात या औषधांचा मुबलक साठा नाही. भारतामध्ये याची गरज जास्त आहे. त्यामुळे या औषधाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, विविध देशांच्या मागणीनंतर भारताने निर्यातबंदी उठविली आहे.