महसूल मंत्री थोरातांची राज्यपालांवर टीका, म्हणाले..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात प्रार्थनास्थळे उघडण्याच्या मुद्द्यावर वाद पेटला आहे. काल या वादात आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यपालांवरच निशाना साधला आहे.

राज्यपालांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्रे लिहिली आहेत का? असा सवाल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. थोरात यांनी म्हटले आहे, की राज्यपालांच्या या विचारांशी राष्ट्रपती सहमत आहेत का? राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांना हात घातला हे योग्य नाही. कोशियारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरे बंद आहेत. त्यामुळे राज्यपालांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्रे लिहिली आहेत का? असा सवाल थोरात यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी पत्र पाठवून याबाबत काही मुद्दे उपस्थित केले. यावरून राजकीय वादंग उठले आहे. संजय राऊत यांनीही काल याबाबत आपलं मत मांडले होते. ते म्हणाले की कोरोनाच्या स्थितीचा विचार करुन महाराष्ट्र सरकार निर्णय घेत आहे. भारताच्या घटनेतच धर्मनिरपेक्षता हा शब्द अंतर्भूत आहे. राज्यपालांच्या पत्राने हे सिद्ध झाले आहे की, त्यांची भारताच्या घटनेचे पालन करण्याची इच्छा दिसत नाही.

राज्यपालांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये. शिवसेनेचे हिंदुत्व मजबूत असून, राज्य संविधानावर चालत आहे का नाही हे पाहावे, असे उत्तर संजय राऊत यांनी दिले.

मुख्यमंत्री आणि राज्य सरकार करत असलेल्या कामाची स्तुती राज्यपालांनी करायला हवी. कोव्हिड पार्श्‍वभूमीवर राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर आहे. राज्यात लोकनियुक्त सरकार आहे, हे राज्यपालांनी लक्षात ठेवावे, असेही राऊत यांनी नमूद केले. राज्यपाल राज्याचे संविधानात्मक प्रमुख असतात. त्यामुळे त्यांनी राज्याचा कारभार संविधानानुसार चालतो का ते पाहावे, असे राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्यपाल कोश्यारी यांनीराज्यातील प्रार्थनास्थळे सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पत्र लिहून विचारणा केली होती. “कोरोनाच्या संकटाशी लढताना तुम्हाला काही दैवी संकेत मिळतात का, तुम्ही तुमचे हिंदुत्व विसरलात की पूर्वी नावडता असलेला ‘सेक्युलर’ शब्द अचानक आवडायला लागला,” असा प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना या पत्रात विचारला होता.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी या पत्राला उत्तर दिले आहे. ठाकरे पत्रात म्हणतात की जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जिवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाउन करणे चुकीचे तसेच, तो एकदम उठवणेही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच, ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.