30 सप्टेंबरपर्यंत छत्री, रेनकोट, प्लास्टिक शीट्स तसेच कव्हर जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत, सरकारचा आदेश

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या पर्श्वभूमीवर सध्याची परिस्थिती आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दादर येथील बैठकी आढावा घेतला. 17 मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत असून केंद्र शासन कशा स्वरूपात लॉकडाऊनचा चौथा टप्पा ठरवते ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. मात्र, राज्याला ज्या महत्त्वपूर्ण सूचना करायच्या आहेत त्याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. पावसाळ्याच्या धर्तीवर राज्य सरकारकडून सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

दादरमध्ये झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या वस्तूंचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2020 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन दिनांक 2 मे 2020 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे. राज्यात लॉकडाऊनच्या काळात करावयाच्या उपायांसंदर्भात शासनामार्फत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार येणारा पावसाळा लक्षात घेऊन छत्री, रेनकोट, प्लास्टिक शीट्स किंवा कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. हा आदेश 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लागू राहणार आहे.