चक्क तहसिल कार्यालयात वाळूमाफियांच्या दोन गटात राडा

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – मागील काही महिन्यांपासून तालुक्यात वाळूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून वाळू तस्करी या ठिकाणी सुरू आहे. या वाळूमाफियांच्या दोन गटांत एकमेकांच्या वाळूच्या गाड्या पकडून देण्यावरून चक्क तहसिल कार्यालयातच जोरदारा राडा झाला. पालम येथील २५ ते ३० जणांनी पूर्णा तहसील कार्यालयात दोघांना बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे येथील तहसील कार्यालय आवारात गोंधळ उडाला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

गुलबर्ग्यात रिक्षाचालकाचा खुन करणाऱ्यांना पुण्यात अटक

दुपारी १ वाजेदरम्यान तालुक्यातील सारंगी परिसरातून वाळूने भरलेला टिप्पर नदीपात्रातून पालमकडे जात होता. तेव्हा पालम येथील काही वाळूमाफियांनी जुन्या वादातून वाळूने भरलेला टिप्पर रस्त्यात अडवून त्या चालकास दमदाटी करून पूर्णा तहसील कार्यालयात आणले. टिप्पर पूर्णेकडे गेल्याचे समजताच त्या टिप्परचा मालक तहसील कार्यालयात आपल्या स्कॉर्पिओतून आला. तेव्हा अगोदरच टिप्परसह दुचाकी घेऊन आलेल्या २५ ते ३० जणांनी त्या स्कॉर्पिओमधील टिप्पर चालक व मालकास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तहसील कार्यालयात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती पूर्णा पोलिसांना तहसीलदार यांनी कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. मात्र पोलिसांनी दोघांना अटक केली असून तलवार, गुप्ती, स्कॉर्पिओ व टिप्पर जप्त केले. पूर्णा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तहसिलदारांनी मात्र एवढे सारे घडल्यानंतही कानावर हात ठेवत आपल्याला काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.