दिल्लीत दंगलीची अफवा पसरवणाऱ्या 6 जणांवर गुन्हे तर 24 जणांना अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रविवारी रात्री दिल्लीमध्ये दंगलीची अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत सहा जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. तर 24 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती दक्षिण दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी दिली आहे. जिल्ह्याच्या मध्य भागातील दोन जण आहेत तर 21 जण हे पश्चिम जिल्ह्यातील आहेत. एकाला रोहिणीतून अटक करण्यात आली आहे. तर आणखी 18 जणां विरोधात कारवाई सरु आहे. ईशान्य दिल्लीतील हिंसाचार प्रकरणात 300 हून अधिक गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती पोलीस आयुक्त एस.एन.श्रीवास्तव यांनी दिली.

रोहिणीतून विकास नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. विकास हा रिक्षा चालक असून त्याने मोबाईलवरून पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन केला होता. अमन विहारमधील ए ब्लॉकमध्ये दंगल सुरु आहे. तिथे गोळीबार करण्यात येतोय असे विकासने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नव्हती. या ठिकाणचे वातावरण शांत होते. यानंतर दंगलीचा बोगस कॉल देणाऱ्या विकासला पोलिसांनी अटक केल्याचे रोहिणी जिल्ह्याचे सहायक पोलीस आयुक्त शंखधर मिश्रा यांनी दिली.

दुसऱ्या एका प्रकरणात पोलिसांनी पुनीत आणि शिव नंदन या दोघांना ताब्यात घेतले. शिव नंदन याने देखील पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून दंगल उसळली असल्याची माहिती दिली. तेच गोळीबार सुरु असल्याचे सांगितले. दंगेखोरांमध्ये मुलं अडकली असल्याचे शिव नंदन याने पोलिसांना सांगितले. एवढेच नाही तर बाईकच्या सायलेन्सरमधून आवाज काढून त्याने गोळीबाराचा आवाज असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर ही अफवा असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला पकडण्यात आले. पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिले. दंगलीच्या अफवा पसरवण्यासाठी बाहेरील लोकांची मदत घेतली गेल, असे दिल्ली पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.