सरकार पडणार असल्याच्या अफवा विरोधात उठवतात : खा. सुप्रिया सुळे

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत असुन हे सरकार पडणार असल्याच्या अफवा विरोधक करत आहे. कोणीही या सरकारला पाडायला हे काय पत्त्यांचे घर नाही असा टोला विरोधकांना लगावुन महाविकास आघाडी सरकार हे पुढील पंचवीस वर्ष राहिल असा आत्मविश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

शिरूर येथे पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार अरूण लाड व जयंत आसगांवकर यांच्या प्रचारानिमित्त आयोजीत बैठकीवेळी खासदार सुळे बोलत होत्या.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पुरंदरचे आमदार संजय जगताप, माजी आमदार सुर्यकांत पलांडे, माजी आमदार गावडे, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे ,जिल्हा परिषद सदस्या सुजता पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रविंद्र काळे,शिरूर आंबेगावचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, महेश ढमढेरे, प्रवक्ते विकास लवांडे, रविंद्रकांत वर्पे, सचिन गोटकुल सदाशिव पवार, शिरूर पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, बाजार समिती सभापती शंकर जांभळकर, माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. किरण आंबेकर, प्रा. नितीन जाधव सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते पवारसाहेबांनी स्थापन केलेले हे विचारांवर आणि धोरणांवर आधारीत एक मजबुत सरकार आहे. उठसुट कोणीही पाडायला हे काय पत्त्यांचे घर वाटले का ? असा सवाल करून कोरोना संसर्गाच्या काळात देखील महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत असुन हे चांगले काम पाहुन विरोधकांच्या पायाखालची माती सरकु लागल्यामुळे त्यांच्याकडुन अशा अफवा पसविल्या जात आहेत त्याकडे लक्ष न देता पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीत माझे कुटुंब आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहनही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.या निवडणुकीत काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते बरोबर राहणार असून याची चिंता विरोधकांनी करू नये असेही यावेळी बोलताना सुळे यांनी विरोधकांना उद्देशुन स्पष्ट शब्दात सांगितले.

शिरूर हवेलीसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातुन पालकमंत्री अजित पवार यांनी मोठा निधी दिला असुन शिरूर तालुक्याला ५० कोटींचा निधी दिला असल्याने तालक्यातील विकास कामांना चालना मिळाली आहे.या निवडणुकीतही आम्ही कुठे कमी पडणार नसुन ते आमचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कर्तव्यच असल्याचा आत्मविश्वास यावेळी बोलताना शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केला. पुरंदरचे आमदार संजय जगताप, माजी आमदार सुर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर आदिंची भाषणे यावेळी झाली.

You might also like