अहमदनगर : दबंग महिला अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी रास्ता रोको

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – हुकुमशाही कार्यपद्धतीचा आरोप करून जिल्ह्यातील क्रीडा संघटना व क्रीडा शिक्षकांनी दबंग जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची बदली करण्यासाठी शहरातील सक्कर चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे नगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून काम करणाऱ्या नावंदे यापूर्वी मंत्रालयात मंत्री तावडे यांच्या ‘ओएसडी’ होत्या. नगरमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कामाचा धडाका लावला. नियमाप्रमाणे काम सुरू केल्यानंतर अनेक क्रीडा संघटना व राजकीय नेतेमंडळी दुखावली गेली. संघटनांनी नियमावर बोट ठेवून काम करणाऱ्या नावंदे यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर आरोप केले. त्यांचे शिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन दिले. आता त्यांच्या बदलीचा इशाराही दिला आहे. यासाठी 17 ऑगस्ट रोजी रास्तारोको करण्यात आला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे हेही नावंदे यांच्या विरोधात आहेत. नियमाप्रमाणे काम करणाऱ्या नावंदे या जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील अनेक मातब्बर मंडळींना अवघड वाटू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी प्रशासनावर दबाव येऊ लागला आहे.

शहरातील विविध क्रीडा संघटना व जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांनी वाडिया पार्क येथील महात्मा गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सक्कर चौकात जाऊन रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात शिवसेना उपनेते अनिल राठोड, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, क्रीडा संघाचे संघटनेचे आप्पासाहेब शिंदे, प्रा. सुनील जाधव, विशाल म्हस्के आदींसह अनेक मान्यवर सहभागी झाले आहे. या आंदोलनामुळे नगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –