पोलीस अकादमीत पोलिसाच्या १२ लाखांवर डल्ला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन राज्याच्या पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या महाराष्ट्र पोलिस अकादमीत आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. बनावट कागद पत्रांच्या आधारे आरोपीने प्रशिक्षण घेत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या सुमारे १२ लाख रुपयांवर डल्ला मारला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीचा हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

भारत केशवराव हूंबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 28 फेब्रुवारी 2014 ते 8 ऑगस्ट 2016 या कालावधीत हा प्रकार घडला. एमपीएतील किंवा आयडीबीआय बँकेशी संबंधित अज्ञात व्यक्तीने पीएसआय दृष्यत पाटील यांच्या नावाने बँकेत वेगवेगळ्या तारखेला धनादेश टाकले. बनावट कागदपत्र्यांच्या आधारे प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकात बदल करण्यात आले. यामुळे आरोपीस एकाच खात्यातून डेबिट कार्डच्या मदतीने पैसे काढता आले. या पद्धतीने आरोपीने तब्बल ११ लाख ९० हजार ३६५ रुपये काढले. फसवणुकीचा हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली असून गंगापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ अधिकारी या प्रकारची चौकशी करीत आहेत. दरम्यान, सायबर सिक्युरिटी आणि तंत्रज्ञान याबाबत राज्यातील पोलिस अधिकाऱ्याना प्रशिक्षण देण्याऱ्या मातृ संस्थेत हा प्रकार घडल्याने चिंता व्यक्त करण्यात येते आहे. संवेदनशील मानल्या जाणाऱ्या एमपीएवर काही दिवसांपूर्वीच एका अज्ञात ड्रोनने चित्रीकरण केल्याचा प्रकार घडला आहे.