…म्हणून मराठी युवकांनी कंपन्यामध्ये जॉईन होण्याचा विचार करावा, रोहित पवारांचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाउनमुळे सर्व अर्थ व उद्योगचक्र ठप्प झाले असून त्याचा परिणाम मजुरांवर झाला होता. या काळात लाखो मजुरांनी आपापल्या गावाकडे स्थलांतर केले आहे. मात्र, लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल होताच, मजूर परत येण्यास सुरूवात झाली आहे. पुणे शहरातही मोठ्या संख्येने मजूर येत असून, यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील युवकांना कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी रूजू होण्याचे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात केल्यानंतर अनेक उद्योग व व्यवसाय सुरू झाले आहेत. पुण्यासारख्या शहरातही उद्योगचक्र हळूहळू फिरू लागले आहे. त्यामुळे मजूर परत येऊ लागले आहेत. शहरात दररोज 17 हजारांपेक्षाही अधिक स्थलांतरित मजूर परतत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात आपली हक्काची कामे जाऊ शकतात. त्यामुळे मराठी युवकांनी तातडीने कंपन्यांत जॉईन होण्याचा विचार करावा. अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला, पण अजून देण्याची गरज आहे. कोणतेही काम लहान मोठे नसते, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

पुणे जिल्हा प्रशासनाच्या माहितीप्रमाणे लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर शहरात उत्तर भारतातून जवळपास 8 हजार स्थलांतरित मजूर परत आले आहेत. ही संख्या 1 जूनपर्यंतची आहे. रेल्वे मंत्रालयानं काही महत्त्वाच्या शहरांना जोडणार्‍या मार्गावर रेल्वे सेवा सुरू केल्यानंतर मजूर परतू लागले आहेत. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातून 1 लाख 20 हजार मजुरांनी स्थलांतर केले होते.