ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाही ‘कोरोना’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन –  ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना आता कोरोनाने ग्रासले आहे. आज दिवसभरात ठाकरे सरकारमधील उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटर द्वारे ही माहिती दिली.

अहमदनगरचे पालकमंत्री असल्याने हसन मुश्रीफ हे अधून मधून दौरा करत असतात. जवळजवळ एक महिन्यांनंतर गुरुवारी ते नगरच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी करोनासंबंधी बैठक घेवून प्रशसनातील अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. नंतर पत्रकार परिषद झाली. त्यानंतर ते कोल्हापूरला परत गेले. कोल्हापूर जिल्ह्यात आणि त्यांच्या कागल मतदारसंघात त्यांचे वर्चस्व आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी सुरुवातीपासूनच काळजी घेतली आहे. त्यांनी सुरुवातीपासूनचं तोंडावरचा मास्क काढला नव्हता त्यांनी सगळ्या पत्रकार परिषद आणि बैठका मास्क घालूनच पार पाडल्या. एवढी काळजी घेऊनसुद्धा त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांनी स्वतः हि माहिती दिली आहे. माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे जे माझ्या संसर्गात आले आहे त्यांनी आपली काळजी घ्यावी आणि कोरोना चाचणी करून घ्यावी. माझी तब्येत आता ठीक आहे. ठाकरे सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, प्राजक्त तनपुरे, अस्लम शेख यांनाही करोनाची बाधा झाली होती मात्र त्यांनी या सगळ्यावर मात केली आहे.