Coronavirus : ब्रिटननंतर आता रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इटली आणि अमेरिकेनंतर रशियामध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. या प्राणघातक विषाणूची रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन यांनाही लागण झाल्याचे आढळले आहे. त्यांनी स्वत: खुलासा केला असून त्यांनी याविषयी राष्ट्रपती पुतीन यांनाही कळविले आहे. ते सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये गेले आहेत. एका वृत्तानुसार, देशाचे पहिले उपपंतप्रधान अँड्रे बेलासॉ हे मिशस्टीन यांचे काम तात्पुरते पाहतील. तथापि, पंतप्रधान म्हणाले की ते मुख्य विषयांवर अँड्रे यांना सल्ला देत राहतील.

जानेवारीत 54 वर्षीय मिशुस्तिन यांना पंतप्रधान म्हणून नेमण्यात आले. व्हिडिओ कॉल दरम्यान, पुतीन यांनी अशी आशा व्यक्त केली की कोरोना विषाणू साथीच्या आजाराने प्रभावित रशियन अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी मिशुस्तिन धोरणे तयार करण्यासाठी बैठकांमध्ये भाग घेत राहतील. रशियामध्ये पंतप्रधान अर्थव्यवस्थेबाबतच्या विषयांना हाताळतात आणि राष्ट्रपतींना अहवाल देतात. पुतीन यांनी अखेर पंतप्रधानांची कधी भेट घेतली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्यापासून पुतीन अधिकाधिक अधिकाऱ्यांसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क करतात.

एका दिवसात रशियामध्ये 7099 प्रकरणांची पुष्टी झाल्याने खळबळ उडाली आहे. रशियामध्ये कोरोना संक्रमितांचा आकडा 1 लाख 6 हजार 498 पर्यंत पोहोचला आहे आणि येथे 1 हजार 73 लोक मरण पावले आहेत. तसेच 11 हजार 619 रुग्ण निरोगी झाले आहेत. कोरोना संसर्गाच्या बाबतीत रशिया जगात आठव्या स्थानी आहे. यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. मात्र, उपचारानंतर ते आता कामावर परतले आहेत.