भाजपकडून गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी; जयंत पाटलांनी दिलं चोख प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली. या प्रकरणामध्ये सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. आता या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. लाड यांच्या मागणीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

मुंबई पोलीस दलाची नाचक्की करणारे कोण ?

आमदार प्रसाद लाड म्हणाले की, सचिन वाझे प्रकरणामध्ये दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आता दोन पोलीस उपायुक्तांची (DCP) नावे बाहेर पडणार आहेत. यामुळे मुंबई पोलीस दलाची नाचक्की होत आहे, नाचक्की करणारे कोण ? असा प्रश्न उपस्थित करून लाड यांनी सचिन वाझे यांना पाठीशी घालणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विधान परिषदेत केली होती. जोपर्यंत अनिल देशमुख राजीनामा देत नाहीत तोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागणार नाही, असे लाड यांनी सांगितले.

गृहमंत्र्यांनी स्वत: हून राजीनामा द्यावा

आमदार प्रसाद लाड म्हणाले, शरद पवार हे जाणते राजे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पक्षाचा गृहमंत्री गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एका व्यक्तीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. हे खेदजनक असून, त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला पाहिजे. तसेच गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वत: हून गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी लाड यांनी केली.

जयंत पाटलांकडून गृहमंत्र्यांची पाठराखण

सचिन वाझे प्रकरणात विरोधी पक्षाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे. जयंत पाटील म्हणाले, सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोणतीही चूक केलेली नाही. सचिन वाझे प्रकरणाचा तपास सध्या एनआयए करत असून, सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. जे कोणी चुकीचे वागले असतील त्यांना शिक्षा होईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

मंत्रिमंडळात खांदेपालट नाही

सचिन वाझे प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळात खांदेपालट होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू झाली आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याची कोणतीही चर्चा नाही, कोणी कितीही संकेत दिले तरी ते राष्ट्रवादी पक्षांतर्गत मंत्रिमंडळ खातेबदलावर चर्चा नाही, असं सांगत जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा फेटाळून लावली.