‘भगवा झेंडा’ लावण्याचा निर्णय अजित पवारांचा, पक्षाचा नाही : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनालइन – धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रवादी पक्ष यापुढे आपल्या कार्यक्रमात पक्षाचा आणि भगवा झेंडा लावणार असल्याची घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच केली होती. यावर बोलताना आज शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सभेत भगवा झेंडा लावण्याचा निर्णय हा अजित पवारांचा होता पक्षाचा नाही असे सांगत त्यांनी अजित पवारांना दणका दिला आहे. मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केले.

शिवसेना – भाजपच्या शिवप्रेमाला आणि भगव्या झेंड्याच्या आग्रहाला राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच हिणवले. त्यामुळेच भाजप-शिवसेनेच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या राष्ट्रवादीच्या या नव्या भगवेकरणावरून अनेक उलटसुलट चर्चा झाल्या. आता अजित पवार यांच्या या निर्णयावरून स्वत: शरद पवार यांनी अजित पवारांना लक्ष केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने घेतलेली ही भूमिका राजकीय असल्याची टीका सुरु झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मात्र, हा निर्णय उशीरा का होईना योग्य असल्याचा वाटत आहे. अजित पवार यांनी भगवा झेंडा लावण्याचा आदेश दिल्यानंतर शरद पवार यांनी यावर कोणतेच भाष्य केले नव्हते. अखेर मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना पवारांनी याबाबतचे मौन सोडले आणि हा निर्णय अजित पवारांचा आहे पक्षाचा नसल्याचे सांगितले.