लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत खुद्द सलमान खानचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अगामी लोकसभा निवडणुकीत अभिनेता सलमान खान लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याविरुद्ध लढणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण खुद्द सलमान खानने याबाबत ट्विट करून गौप्यस्फोट केला आहे. निवडणूक लढवणार असल्याच्या अफवांमध्ये तथ्य नसल्याचे त्याने आपल्या ट्विटमधून म्हंटले आहे.

काय आहे सलमानचे ट्विट

‘मी निवडणूक लढवणार असल्याच्या अफवा ऐकायला मिळाल्या, मात्र त्यात तथ्य नाही. त्याचप्रमाणे मी कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचारही करणार नाहीये’ असं सलमानने ट्विटरवर लिहिलं आहे.

इंदौरमधून वारंवार खासदार म्हणून भाजपाकडून निवडून आलेल्या लोकसभा स्पिकर सुमित्रा महाजन आता नवव्यांदा इंदौर मधून लोकसभेसाठी मैदानात उतरू शकतात. अशातच काँग्रेसला इंदौर मधून अशा चेहऱ्याची निवड करायला हवी जो चेहरा सुमित्रा महाजन यांना देखील टक्कर देऊ शकेल. त्यामुळे प्रसिद्ध अभिनेता सलमान खान एक तगडा उमेदवार ठरू शकतो. म्हणूंच काँग्रेस सलमानच्या नावाचा सध्या विचार करीत आहे. सलमानचा जन्म मध्य प्रदेशचा आहे. कल्याणमल नर्सिंग होममध्ये सलमानचा जन्म झाला. त्यामुळे जन्मभूमीत सलमानला जनमत मिळेल, असा काँग्रेसचा अंदाज असल्याचे म्हटले जात होते. आशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यामुळे खरंच सलमान राजकारणाच्या आखाड्यात उतरणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता स्वतः सलमान खानाने या वृत्ताचे खंडन केल्यामुळे या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.