वादग्रस्त ! स्त्रियांबद्दल बोलताना भिडे गुरूजींची जीभ घसरली, मुलं नसणार्‍या स्त्रियांना म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी पुन्हा एकदा वादाच्या कचाट्यात अडकले आहे. मंगळवारी राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याबाबत हिंदू समाज नपुंसक असल्याचं वादग्रस्त विधान त्यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान केलं. तसेच त्यांनी यावेळेस थेट गरोदर स्त्रियांसंदर्भातही वक्तव्य केलं. “वांझोट्या बाईला स्त्रित्व नसते,” असेही ते यावेळेस हिंदू समाजाच्या राष्ट्रीयत्वाबद्दल बोलताना म्हणाले.

“जसं नपुंसकत्व आल्यावर पुरुषत्व कमी होतं तसचं वांझ स्त्रीमध्ये स्त्रीत्व कमी असतं. अशा लोकांसाठी आपण नपुंसक आणि वांझ यासारखे शब्द वापरतो. तसंच हिंदूंच झालं आहे. हिंदूंमध्येही राष्ट्रीयत्व या विषयाबद्दल पुरुषत्व आणि स्त्रित्व कमी आहे. राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर हिंदू समाज शंभर टक्के नपुंसक आणि वांझ आहे,” असं भिडे म्हणाले. सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान भिडे गुरुजी नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात बोलत होते

तसेच मुस्लीमांकडून राष्ट्रवादीची अपेक्षा करणं मूर्खपणाचं आहे असंही भिडे यावेळी म्हणाले. “राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर आम्ही कमी पडतो. सुधारित नागरिकत्व कायदा भारतीयांना जोडणारा आहे. असं असतानाही काहीजण याबद्दल संभ्रम पसरवताना दिसत आहेत,” असंही भिडे म्हणाले.

पुण्यामध्ये भिडे यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेऊन सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली होती. “सध्याच्या घडीला स्वतःला शिकलेली म्हणवणारी माणसं या कायद्याच्या बाबतीत अनेकांची दिशाभूल करत आहेत. मुस्लीम समाजही आपल्या देशाचा नागरिक आहे. मात्र त्यांच्यातही राष्ट्रीयत्वाचा अभाव आहे. मुळात हिंदूंमध्येच राष्ट्रीयत्वाचा अभाव आहे तर मुस्लीम समाजाकडून अपेक्षा काय ठेवायची?,” असाही प्रश्न संभाजी भिडे यांनी उपस्थित केला होता.

याआधीही केली आहेत स्त्रियांबद्दल वादग्रस्त वक्तव्य :

दरम्यान, याआधीही संभाजी भिडे यांनी अशाप्रकारची विधाने केली आहेत. मागील वर्षी नाशिकमध्ये त्यांनी “माझ्या शेतातला आंबा खाणाऱ्या जोडप्याला आपत्यप्राप्ती होते. आतपर्यंत १८० जोडप्यांनी हा आंबा खाल्ला आहे, त्यापैकी दीडशे जोडप्यांना आपत्यप्राप्ती झाली आहे,” असा दावा त्यांनी केला होता. एवढेच नव्हे तर, इस्रोची चांद्रयान २ मोहिमेला अपयश आले तेव्हा अमेरिकेने एकादशीच्या दिवशी चांद्रयान सोडल्यानेच त्यांची चांद्रमोहीम यशस्वी झाली असं वक्तव्य भिडे यांनी केलं होतं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/