‘आमदार झाल्यामुळं त्यांनी फालतुगिरीचे धंदे बंद करावेत’ : गोपीचंद पडळकरांना संभाजी ब्रिगेडनं सुनावलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जेजुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरणारून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावरून आता संभाजी ब्रिगेडनं पडळकरांवर निशाणा साधला आहे. इतकंच नाही तर त्यांच्या भूमिकेचा निषेधही केला आहे.

‘पडळकरांच्या स्टंटनं अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचाही अपमान’
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले की, कोणत्याही महापुरुषाच्या कर्तृत्वाचा इतिहास समाजात रुजवण्यासाठी पुतळे, शिल्प उभे केले जातात. जेजुरी येथे सुद्धा अहिल्याराणी होळकर यांचा पुतळा बसवण्यात येत आहे. त्याचं अनावरण राज्य सरकारच्या वतीनं अधिकृत केलं जाईल. मात्र सत्तेच्या आणि पदाच्या हव्यासापोटी विरोधाचं विष पिऊन काही तथाकथित गोपीचंद पडळकर सारखे आमदार स्टंट करण्यासाठी पुतळ्याचं अनावरण करतात. हा त्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचाही अपमान आहे. जर सरकार पुतळ्याची स्थापना किंवा अनावरण करणार असेल तर त्यांच्या पोटात राजकारणाचं पिल्लू का वळवळ करत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.

‘आमदार झाल्यामुळं त्यांनी फालतुगिरीचे धंदे बंद करावेत’
पुढं बोलताना ते म्हणाले, राजमाता अहिल्याराणी होळकर यांनी स्वकर्तृत्वार स्वराज्यासाठी संघर्ष केला. त्या लढल्या, समाजहिताचं काम करत राहिल्या. अंधश्रद्धा, कर्मकांड विरोधात त्यांनी आवाज उठवला. शिंदे-होळकर घराण्याचं नाव मोठं करत राहिल्या. हा इतिहास आहे. गोपीचंद पडळकर यांना जर एवढीच पुतळ्याचं अनावरण करण्याची घाई होत असेल तर त्यांनी 5 वर्षात भाजपानं शब्द देऊनही धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही यासाठी सुद्धा जाब विचारला पाहिजे. आता आमदार झाल्यामुळं त्यांनी फालतुगिरीचे धंदे बंद करावेत असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

‘विनाकारण स्टंट अर्थात चमकोगिरी करू नये, पडळकरांनी पदाचा त्याग करावा’
जेजुरी, खंडोबा आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्राचं कुलदैवत आणि अस्मिता आहे. सरकारनं त्यांच्या पुतळ्याचं सन्मानानं अनावरण करून महापुरुषांचा सुद्धा सन्मान राखला गेला पाहिजे अशी आजपर्यंत संभाजी ब्रिगेडची भूमिका राहिली आहे. गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणासाठी स्वत:चा किंवा पदाचा त्याग करावा. पक्षाची वेठबिगारी करण्यासाठी विनाकारण स्टंट अर्थात चमकोगिरी करू नये. अधिकृत उद्घाटन करण्यासाठी सरकारसोबत पत्रव्यवहार करावा मग शहाणपणा शिकवावा. पडळकरांनी केलेला प्रकार निषेधार्थ आहे. या प्रकरणी जेजुरी देवस्थान समितीनं आणि राज्य सरकारनं आमदार गोपीचंद पडळकर व त्यांच्या सहकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे.

नेमकं प्रकरण काय ?
जेजुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे. मात्र त्यापूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यावर आक्षेप घेतला. शुक्रवारी पहाटे 5 वाजता त्यांनी जेजुरी गडावर जाऊन पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न केला. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवारांसारख्या भ्रष्ट नेत्यानं करावं हा अहिल्यादेवींचा अपमान आहे असं विधान पडळकरांनी केलं. यानंतर पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी गडावर गोंधळ घातला. त्यांना पुतळ्याच्या चौथाऱ्यावर जाऊ दिले नाही. यावेळी शरद पवारांविरोधात घोषणाबाजीही झाली.