‘सनातन’ वर बंदी आणू देणार नाही : हिंदू जनजागृती समिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

डॉ . नरेंद्र दाभोळकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचे नाव घेण्यात आले होते. एवढेच नव्हे तर या संस्था बंद करण्यात याव्यात अशी मागाणी करण्यात येत होती. या निषेधार्थ आज सनातन संस्थेच्या वतीने पुण्यात मोर्चा काढण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत सनातन आणि हिंदू जनजागृती समितीवर बंदी आणू देणार नाही. तसा प्रयत्न झाला तर तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक पराग गोखले यांनी दिला.

दहशतवादीविरोधी पथक आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) काही संशयित हिंदुत्ववादी दहशतवाद्यांना अटक केली असून या अटकेच्या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. पुण्यात मंगळवारी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले. बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप उद्यान चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. बाजीराव चौक – अप्पा बळवंत चौक – शनिवारवाडा – कसबा गणपती मंदिर येथे मोर्चाचा शेवटचा टप्पा होता. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. सत्याची बाजू नेहमीच मांडू, आम्ही सारे हिंदू, अंनिस नव्हे वैज्ञानिक भोंदू, जवाब दो अंनिस असे फलक या मोर्चात दिसत होते.

[amazon_link asins=’B07CC1X3DY,B07D77V1DX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’87b7bf64-a546-11e8-9749-09c93940cfa0′]

समितीचे समन्वयक पराग गोखले म्हणाले, हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचा नरेंद्र दाभोलकर ते गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंध नाही. या हत्येशी दोन्ही संघटनांचा संबंध नसताना देखील आमचा संबंध जोडून वारंवार बदनामी केली जात आहे. ही निषेधार्ह बाब असून कोणत्याही परिस्थितीमध्ये संघटनेवर बंदी आणू देणार नाही. असा प्रयत्न झाल्यास त्या विरोधात तीव्र लढा उभारला जाईल, असे त्यांनी सांगितले.