वाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा

धामणगाव (अमरावती) : पोलीसनामा ऑनलाईन – अमरावतीत वाळू माफियांची दादागिरी सुरूच आहे. आज (सोमवार) दुपारी साडे बाराच्या सुमारास वाळू माफियांनी तहसीलदार अभिजित नाईक यांना डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने नाईक हे थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या सुमो गाडीचा चुराडा झालाय. धामणगाव रेल्वे येथील तहसीलदार अभिजीत नाईक यांनी सातेफळ इथं अवैध रेतीचा ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता, ट्रकचालकाने ट्रक न थांबवता सरळ तहसीलदारांच्या गाडीवर ट्रक नेऊन त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत तहसीलदार अभिजित नाईक, चालक व एक कर्मचारी गंभीर जखमी झाले.

धामणगावचे तहसीलदार अभिजीत नाईक हे शासकीय वाहन क्रमांक एम एच २७ एए ५०३ ने चांदूर रेल्वेकडे एसडीओंचा प्रभार सांभाळण्याकरिता जात होते. सातेफळ फाट्याजवळ रेतीने अर्धवट भरलेला ट्रक क्रमांक एमएच २७ बीएक्स २९० च्या चालकाला संबंधित ट्रक थांबण्यासाठी हात दाखविला असता ट्रकचालकाने थेट तहसीलदारांच्या गाडीवर ट्रक चढविला. यात तहसीलदार अभिजित नाईक (४०) गंभीर जखमी झाले. त्यांच्या पाठीला, हाताला दुखापत झाली, तर चालक महेंद्र नागोसे यांच्या पाठीला मुका मार लागला आहे. कर्मचारी बठे यांना डोक्याला मार लागलाय तिघांना चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रेती चालकाने मुद्दामपणे शासकीय वाहनाला उडवून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार तहसीलदार अभिजित नाईक यांच्यावतीने तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. आमदार वीरेंद्र जगताप जि.प. सदस्य अनिता मेश्राम यांनी  तहसीलदार  नाईक यांची भेट घेऊन विचारपूस केली. विधान परिषदेचे आमदार अरुण अडसड यांनी भ्रमणध्वनीद्वारे नाईक यांच्या प्रकृतीबाबत जाणून घेऊन घटने ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना कळविली. प्रभारी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, निवासी जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी घटने विषयी माहिती जाणून घेतली तळेगाव दशासर व चादूर रेल्वेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळ गाठले आहे.