Pune News : पुण्याच्या ग्रामीण भागात चंदन तस्करांचा धुमाकुळ, शेतकऱ्यांच्या घराजवळील चंदनाच्या झाडांची चोरी

किरकटवाडी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे ग्रामीण भागात चंदन तस्करांनी धुमाकुळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या घराजवळ असलेल्या चंदनाची झाडे तस्करांकडून चोरी केली जात आहेत. हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चंदन तस्करांचा धुमाकुळ सुरु आहे. किरकटवाडी येथील शेतकऱ्याच्या घराजवळ असलेल्या दोन चंदनाच्या झाडांची तस्करांनी चोरी केली. तस्करांनी शनिवारी (दि.2) पहाटेच्या सुमारास 12 व 13 सेंटीमीटर व्यासाची दोन झाडे तोडून नेली.

अंकुश, लहू व दत्ता हगवणे या तिघा भावांची किरकटवाडी येथे एकत्रित शेती आहे. ते रहात असलेल्या घराच्या मागे दोन चंदनाची मोठी झाडे होती. शनिवारी सकाळी ते घराच्या मागे गेले असता त्यांना चंदनाची झाडे अज्ञात व्यक्तीने कापून नेल्याचे आढळून आले. यापूर्वी हगवणे यांच्या शेतातून तीन चंदनाची झाडे चोरीला गेली होती. याबाबत अंकुश हगवणे यांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार अजित शिंदे करीत आहेत.

चंदन तस्करांना रोखण्यास पोलीस, वनविभाग अपयशी

दरम्यान, परिसरातील नांदोशी, खडकवासला, किरकटवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतातून व वनविभागाच्या हद्दीतून सर्रासपणे चंदनाची तस्करी सुरु आहे. मात्र यावर कारवाई करण्यात पोलिस आणि वनविभाग अपयशी ठरत असल्याचे दिसून येते. मागील महिन्यात खडकवासला जवळील लष्कराच्या हद्दीतून चंदन चोरी झाली होती. त्यावेळी भारत शिवाजी जाधव (रा. बोरीपार्धी, ता. दौंड) याला अटक केली होती मात्र त्याचे इतर साथिदार अद्यापही फरार आहेत. त्यातच किरकटवाडी येथे दोन चंदनाची झाडे चोरीला गेल्याने या परिसरात चंदन तस्करांची टोळी पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.

वनविभागाचा अजब नियम

किरकटवाडी येथील हगवणे यांच्या शेतातून चोरीला गेलेली चंदनाची झाले 12 व 13 सेमी व्यासाची होती. वनविभागाच्या नियमांनुसार 15 सेमी पेक्षा जास्त व्यास असेल तरच त्याची झाड, म्हणून गणना होते. त्यामुळे हगवणे यांच्या शेतातून चोरीला गेलेल्या झाडांचे मुल्यांकन होऊ शकत नसल्याचे वनरक्षक मंजुषा घुगे यांनी सांगितले.

अशी होते चंदन तस्करी

चंदन तस्करी करणारे दिवसा शेतात, जंगलात फिरून चंदनाची झाडे हेरून ठेवतात. त्या ठिकाणी कोणी नसेल तर गिरमीटाच्या सहाय्याने झाडाच्या बुंद्याला जमिनीपासून काही उंचीवर छित्र पाडून ते चोर गाभा भरलेला आहे की नाही याची खात्री करतात. काही वेळा किरकोळ रक्कम देऊन शेतकऱ्यांकडून चंदनाची झाडे विकत घेतात. किंवा रात्रीच्या वेळी झाड तोडून नेतात. चोरी करणारे हे याच भागातील असतात. त्यांना या परिसराची संपूर्ण माहिती असते. पोलीस किंवा वन विभागाकडून कारवाई होत नसल्याने पुणे ग्रामीण भागात तस्कर गावागावात पसरले आहेत.