ऑनलाइन गुन्हे नोंदीत सांगली प्रथम, IG डॉ. सुहास वारके यांची माहिती

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात खून, जबरी चोरीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे. चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये गतवर्षीपेक्षा थोडी वाढ झाली आहे. या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यातील गस्तीपथके सक्षम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऑनलाइन गुन्हे नोंदणी करण्यात सांगली जिल्हा प्रथम स्थानावर असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. वारके वार्षिक तपासणीसाठी सांगली दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सांगली जिल्हा पोलिस दलाची वार्षिक तपासणी करण्यात आली. त्यात खून आणि जबरी चोरीचे गुन्हे गतवर्षीपेक्षा कमी झाल्याचे दिसून आले. मोका अंतर्गत वर्षात 166 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह पोलिस ठाण्यांची गस्तीपथके सक्षम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांना अत्याधुनिक यंत्रणांचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

डॉ. वारके म्हणाले लोकसभा-विधानसभा निवडणूक, महापूर यामुळे पोलिसांवर मोठा ताण होता. कोल्हापूर परिक्षेत्राच्या क्रीडा स्पर्धा सांगलीत उत्साहात झाल्या. त्यामुळे पोलिसांचा ताणतणाव थोडा कमी झाला आहे. गेल्या वर्षभरात नाविण्यपूर्ण प्रयोग करण्यात आले. वाहतूक शिस्तीसाठी लेफ्ट फ्री, प्लास्टिकचे दुभाजक बसविण्यात आले आहेत. तसेच सीसीटीव्हीमुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी “दिशा’ नवा उपक्रम राबविण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. त्यांची तातडीने पूर्तताही करण्यात आली आहे. यावेळी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा उपस्थित होते.

Visit : policenama.com