राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्या खूनप्रकरणी चौघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील खटाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहायकांचे बंधू आनंदराव पाटील यांचा दि. 2 फेब्रुवारी रोजी निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पूर्ववैमनस्य, शेत जमिनीचा वाद यातून सुपारी देऊन त्यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी निरा (जि. पुणे) येथील एका गुन्हेगारासह चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दत्तात्रय रामदास जाधव (वय 33, रा. निरा) अतुल रमेश जाधव (वय 22, रा. बावडा, जि. सातारा) लक्ष्मण बाबुराव मडिवाल (वय 60) अरविंद शंकर पाटील (वय 65, दोघेही रा. खटाव, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 2 फेब्रुवारी रोजी खटाव येथे अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करून आनंदराव पाटील यांचा खून केला होता. मृत आनंदराव पाटील राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी सरपंच होते. शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहायकांचे बंधू होते. त्यामुळे या घटनेने संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली होती. यातील मारेकर्‍यांना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते.

घटनेची गंभीर दखल अधीक्षक शर्मा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तातडीने तपास करून संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी तपासासाठी पथके तयार केली होती.

दरम्यान निरीक्षक पिंगळे यांना हा खून दत्तात्रय जाधव याने साथीदारांच्या मदतीने तसेच सुपारी घेऊन केल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने निरा (जि. पुणे) येथे त्याच्या हालचालीवर पाळत ठेवून सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने लक्ष्मण मडिवाल यांचे आनंदराव पाटील यांच्याशी पूर्ववैमनस्य तसेच राजकीय वाद होता असे सांगितले. अरविंद पाटील यांची शेत जमीन विकत घेतल्याचाही मडिवाल तसेच अरविंद पाटील यांना राग होता. या रागातूनच त्या दोघांनी दत्तात्रय जाधव याला पाटील यांच्या खुनाची सुपारी दिली होती. त्यानुसार दत्तात्रय जाधव तसेच अतुल जाधव यांनी हा खून केल्याची कबुलीही दिली. त्यानंतर चारही संशयितांना अटक करण्यात आली.

अधीक्षक शर्मा, निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुनील हारूगडे, उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, अंतम खाडे, अमित परीट, बिरोबा नरळे, साईनाथ ठाकूर, वैभव पाटील, जितेंद्र जाधव, सचिन कनप, सागर लवटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान यातील मुख्य संशयित दत्तात्रय जाधव हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर लोणंद, निरा पोलिस ठाण्यात दरोडा, दरोड्याची तयारी असे गुन्हे दाखल आहेत. लक्ष्मण मडिवाल याच्यावरही भिलवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.