सांगलीत मोटरसायकलस्वारास लुटणाऱ्या दोघांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली शहरातील वसंतदादा औद्योगिक वसाहत येथे रात्री उशिरा मोटारसायकलस्वारास लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वसंतदादा कुस्ती केंद्राजवळ ही कारवाई केली. बसवराज कलप्पा अडकाई (वय 22), तेजस अमर बिरांजे (वय 19, दोघेही रा. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

Advt.

सांगलीतील औद्योगिक वसाहत परिसरात एक मोटारसायकल स्वारास रात्री उशिरा लुटणाऱ्याना तातडीने अटक करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार शाखेचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी एक विशेष पथक तयार करून त्यांना संशयितांना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाला दोन संशयित वसंतदादा कुस्ती केंद्राजवळ थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यानी औद्योगिक वसाहतीत एकाला लुटल्याची कबुली दिली. त्याना अटक करून मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. बसवराज अडकाई पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुनील हारुगडे, अमित परीट, शशिकांत जाधव, जितू जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.