सेवा वस्तीतील विद्यार्थिनींची सॅनिटरी नॅपकीनअभावी घुसमट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शालेय विद्यार्थिनींच्या मनामध्ये संकोच असल्यामुळे त्या कुटुंबीयांसमवेत संवाद साधत नाहीत. त्यामुळे त्यांची घुसमट होत आहे. आई किंवा मोठ्या बहिणीशी संवाद साधल्यामुळे ही समस्या जाणवत नव्हती. मात्र, आता लॉकडाऊन असल्यामुळे कुटुंबातील सर्वच मंडळी घरात असल्यामुळे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. मुलींशी संवाद साधल्यामुळे या समस्येची उकल झाली व सध्या काही प्रमाणात याचे निराकरणही झाले आहे.

हडपसर (सातववाडी-गोंधळेनगर) येथील महात्मा फुले वसाहतीमध्ये सहयोग संस्थेच्या वतीने अभ्यासिका, किशोरी प्रकल्प आणि जनकल्याण समितीच्या माध्यमातून संस्कार वर्ग चालविले जातात. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून नव्हे, तर कर्तव्य म्हणून अन्नधान्य किटचे देण्यात आले. यावेळी अनेक किशोरवयीन विद्यार्थिनी म्हणाल्या की, लॉकडाऊनमुळे औषधाच्या दुकानामध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे मुलींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यात मोठ्या अडचणी येत असून, त्यांची मुस्कटदाबी होत आहे.

कोरोना प्रादुर्भाव धोका, मेडिकलमधील रांग, रस्त्यावरील शुकशुकाट, पोलीस बंदोबस्त अशा एक ना अनेक समस्यांचा डोंगर उभा असल्याने अनेक मुली मेडिकलमध्ये जाऊन नॅपकीन खरेदी करण्यास टाळाटाळ करीत असल्याची समस्या मुलींनी मांडली. मुलींची समस्या समजून घेत अभ्यासिकेतील विद्यार्थनी आणि आणि त्यांच्या घरातील महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले. मागिल चार दिवसांपासून 120 नॅपकिन दिले असून, परिसरातील आणखी महिला-मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन देण्याचे नियोजन आहे. सेवा वस्तीमध्ये सॅनिटरी नॅपकिन देत असताना अनेकांच्या भुवया उंचावत असून, सर्वे चालू आहे का, कशासाठी तुम्ही हे करता, अशा एक ना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागेल. यामुळे सॅनिटरी नॅपकीन देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाची वेळ घेऊन त्यांना दिले जात आहे.