Sanjay Kakde : ‘मराठा आरक्षण फडणवीसांनी दिले; एकही मराठा मुख्यमंत्री मराठा आरक्षण देऊ शकला नाही ! CM ठाकरेंचा महाविकास आघाडीत जीव गुदमरतोय’; आगामी काळात पंढरपूर पॅटर्न महाराष्ट्रातही दिसेल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो. आणि महाराष्ट्रात कुठेही पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडणार आहे, अशी ग्वाही भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती झालेल्या माजी खासदार संजय काकडे यांनी आज दिली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण न करता कोरोनाला रोखण्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. परंतु, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार सतत केंद्र सरकारकडे बोट दाखवून कोरोनाची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारसाठी देशातील सर्व राज्यांनादेखील मदत करायची असते. आपण राज्य म्हणून कोरोनावरील उपचाराची जबाबदारी घेणार की नाही? असा प्रश्न देखील भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी उपस्थित केला. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना या दोन ठिकाणी कोरोनाचा उद्रेक सर्वाधिक झाला होता. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. पुण्याचे स्थान देखील महत्वाचे आहे. असे असताना कोरोनाला रोखण्यात व पुरेशी उपाययोजना करण्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार सपशेल अपयशी ठरले असल्याचे सांगून भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला कोरोनाच्या वाढीसाठी जबाबदार धरून त्यांच्या नियोजनशून्य कारभारावर जोरदार टीका केली.

उत्तर प्रदेशाची लोकसंख्या आपल्यापेक्षा जास्त आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र विकसित राज्य आहे. त्यामुळे राज्य म्हणून आपण जबाबदारी घेतली पाहिजे. मोफत लसीकरणाची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आणि आता जागतिक निविदा काढणार म्हणून सांगतात. हे असं नुसतं बोलून चालत नाही. आता तिसरी लाट येणार म्हणून तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याला तोंड देण्यासाठी काय पूर्वतयारी काय केली आहे हे देखील महाराष्ट्रातील जनतेला सांगावे, असेही प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे म्हणाले.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराविषयी बोलताना भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ताळमेळ नसलेले सरकार महाराष्ट्रात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक बोलतात, तर उपमुख्यमंत्री अजित पवार दुसरं बोलतात. त्याचवेळी बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण वेगळंच बोलतात… यांच्यामध्ये एकवाक्यताच नाही. या तिघांनी किमान कोरोनाच्या निमित्ताने तरी एकत्र यावे. आणि महाराष्ट्रातील जनतेला कोरोनाच्या संकटातून वाचविण्याची नैतिक जबाबदारी पार पाडावी.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह उद्योग जिथे आहेत तिथला कोरोना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. उद्योग सुरू राहिले तर लोकांचे रोजगार टिकतील व सरकारला उत्पन्न मिळेल. आतासारखंच दुर्लक्ष कराल तर, उद्योग बंद पडतील आणि रोजगाराचे प्रश्न उपस्थित होतील. आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे भयानक प्रश्न निर्माण होतील, असेही उपाध्यक्ष संजय काकडे यांनी सांगितले.

कोरोनाला रोखण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व लोक महाराष्ट्र सरकारला मदत करीत आहेत. आमचे नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील केंद्र सरकारच्या सतत संपर्कात असून प्रत्येक वेळी मदत मिळविण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी मोलाची भूमिका निभावली आहे. तसेच, यापुढेही कोरोना रोखण्यासाठी सरकारला सर्व सहकार्य करण्याचे वेळोवेळी त्यांनी जाहीर केले आहे.

मराठा आरक्षण फडणवीसांनी दिले; एकही मराठा मुख्यमंत्री मराठा आरक्षण देऊ शकला नाही

महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा 1985 पासून सुरू आहे. तेव्हापासून महाराष्ट्रात अनेक वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार होते. शरद पवार तीनवेळा मुख्यमंत्री होते. त्यांच्या व्यतिरिक्त मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिले. इतर कोणाही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. फडणवीस यांनी दिलेल्या आरक्षणाला उच्च न्यायालयाने मान्यता देखील दिली होती. परंतु, या महाविकास आघाडी सरकारला ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकविता आले नाही. भाजपाची भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजुनेच आहे. आता महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणाविषयी काय भूमिका घेणार हे त्यांनी जाहीर करावे, असेही प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडीत जीव गुदमरतोय !

भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर संजय काकडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना मी ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहीत आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये जे काही चाललंय ते त्यांना आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील. ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत. शिवसेना गेली 25 वर्षे युतीत होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मला वाईट वाटते, असंही ते म्हणाले.

पंढरपूर पॅटर्न महाराष्ट्रातही दिसेल !

उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेथील प्रमुख विरोधी असलेले तिन्ही पक्ष एकत्र येऊनही उत्तर प्रदेशातील जनतेने भाजपा बहुमताने निवडून दिले. तोच पॅटर्न आपल्याला पंढरपूर पोटनिवडणुकीत दिसला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र लढूनही पंढरपुरात भाजपाचा उमेदवार निवडून आला. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्रातील राष्ट्रवादी, काँग्रेस शिवसेना पक्षातील अनेक नेते आणि काठावर असलेले नेते भाजपाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पंढरपूर पॅटर्न आता संपूर्ण महाराष्ट्रभर दिसेल, असेही प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे काकडे यांनी सांगितले.

देशात, राज्यात व पुणे शहरात भाजपा क्रमांक एकचा पक्ष आहे. येणाऱ्या काळात राज्यातील महत्वाच्या दहा महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. कोरोनाच्या परिस्थितीनुसारच त्या होतील. त्यामुळे पुढील काळात आपण पक्षाच्या हितासाठी आवश्यक तिथे पक्षाचे वरिष्ठ नेते देतील ती जबाबदारी पार पाडू, असेही संजय काकडे म्हणाले.

गजानन मारणेशी संबंध असल्याच्या संशयावरून झालेल्या अटकेबाबत पत्रकारांनी विचारले असता संजय काकडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसकडून चुकीच्या राजकारणाचा पायंडा पाडला जात आहे. असं राजकारण त्यांनी करू नये ही अपेक्षा आहे. वास्तविक अटक केल्यानंतर माझे संबंध असल्याबाबत पुरावे सादर करण्यास न्यायाधीशांनी पोलिसांना सांगितल्यावर पोलीस निरुत्तर झाले. त्यामुळे केवळ प्रतिमा खराब करण्याच्या हेतूने तो गुन्हा दाखल केला होता. हे असले प्रकार राष्ट्रवादीने व त्यांच्या नेत्यांनी थांबवावेत. मी गेली 35 वर्षे पुण्यात व्यवसाय करतोय आणि गेली सात वर्षे राजकारणात आहे. मी कधीही खालच्या थराला जाऊन राजकारण केले नाही, असेही संजय काकडे म्हणाले.