नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज ?, खा. संजय राऊत म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात खांदेपालट करत काँग्रेसने नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे विधानसभेच अध्यक्षपद रिक्त झाल्याने त्या पदासाठी पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली आहे. यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. त्याला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे.

खासदार राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपद हे पद पाच वर्षासाठी असते. अध्यक्षपदावरील व्यक्तीने राजीनामा दिल्याने पुन्हा निवडणूक होते. घटनात्मक पदाच्या निवडणुका वारंवार येऊ नये, असे आम्ही सामनात म्हटले आहे. महाविकास आघाडीच सरकार आहे. तीन पक्षांच बहुमत आहे. तरी या गोष्टी टाळायला हव्या होत्य. काँग्रेसला संजीवनी देण्याचा त्यांचा उत्साह महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांनी पक्षातंर्गत परिवर्तन केल असेल, तर तो त्यांचा अतंर्गत प्रश्न आहे. पटोले हे सक्षम आणि आक्रमक नेते असून राज्यात काँग्रेसला ऊर्जा देण्याचे काम त्यांनी करावे. प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. आम्हीही आमचा पक्ष वाढवू. पण, काँग्रेस देशात मजबूत व्हावी, असे खासदार राऊत म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेबद्दल राऊत म्हणाले, शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे यावर पुन्हा चर्चा होईल. जेव्हा काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिले होते ते 5 वर्षासाठी दिले होते. तेंव्हा कुणाला माहिती नव्हते की विधानसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक होईल. पण, ठीक आहे. काँग्रेसने निर्णय घेतल्याने तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, असे ते म्हणाले.