सरपंचाची निवड सदस्यांमधूनच होणार, मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

सोलापूरः पोलीसनामा ऑनलाईन – सध्या सोशल मिडियावर काही पोस्टचा प्रचंड धुमाकूळ सुरु आहे. सरपंचाची निवड पूर्वीप्रमाणे जनतेतून होणार असल्याचे या पोष्टमधून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरपंच होणार कसा, याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) सरपंच निवडीबाबत माहिती देतांना म्हणाले सरपंचाची निवड ही सदस्यांमधूनच (sarpanch-will-be-selected-among-members) होणार आहे.

सदस्यांमधून सरंपच निवडीचा निर्णय हा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यासाठी कायद्यातही बदल केला आहे. आता तोच निर्णय कायम आहे. येत्या काळात होणा-या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सरपंचाची निवडही सदस्यांमधून केली जाणार आहे. सोशल मिडियामध्ये व्हायरल होणा-या काही पोष्टमध्ये उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिका व याचिकेमध्ये सरकारने माघार घेतल्याने जनतेतून सरपंच निवडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरपंच निवडीबाबत कमालीचा संभ्रम पसरला आहे. हा संभ्रम आता पालकमंत्री भरणे यांच्या विधानामुळे दूर झाला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी कायद्यातही बदल केला. सरपंच निवडीची ही पध्दत गावच्या विकासाला मारक असल्याने राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने जनतेतून सरपंच निवडण्याची पध्दत बंद केली आहे. निवडणुकीला सामोरे जाणा-या ग्रामपंचायतीचा सरपंच आता सदस्यांमधून निवडण्यात येणार असल्याने आतापासूनच पॅनल नि्र्मितीच्या हालचालींना वेग आला आहे.