Coronavirus : सातार्‍यात मुख्याधिकारी, प्रांताधिकार्‍यांनी रचलं ‘सरण’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मृतांचा आकडा देखील वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना आपल्या जवळच्या व्यक्तीला देखील शेवटचे पाहता येत नसल्याचे पहायला मिळत आहे. असाच एक प्रकार सातारामध्ये दिसून आला. मृत व्यक्तीची पत्नी रुग्णालयात तर मुलगा परदेशात अशा परिस्थितीमध्ये मृत व्यक्तीवर मुख्याधिकारी, प्रांतधिकाऱ्यांनी सरण रचून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. परंतु यावेळी सातारकरांनी माणुसकी दाखवली नसल्याने आरोग्य आणि प्रशासन यंत्रणेला आपले काम सोडून अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.

सातारा सरकारी रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातील एका वृद्धाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. ते कोरोनासदृष्य रुग्ण म्हणून विलगीकरण कक्षात दाखल होते. ते कोरोनाबाधित असल्याचे मंगळवारी अहवालातून समोर आले. दरम्यान, विलगीकरण कक्षातील रुग्णाचा मृत्यू होण्याची साताऱ्यातील ही पहिलीच घटना असल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.

सातारा सरकारी दवाखान्यात 63 वर्षीय वृद्ध व्यक्तीने नुकतेच अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील आपल्या मुलाकडे जाऊ आली होती. चार दिवस परदेशात राहून आल्यानंतर तेथील परिस्थिती पाहून ते पुन्हा भारतात परत आले. मात्र, परत येताना त्यांना कोरोना विषाणूने गाठले. त्यांचे यापूर्वीचे अहवाल निगेटिव्ह आले. तरीही मागील चौदा दिवस ते सिव्हिल रुग्णालयात दाखल होते. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांची पत्नीही सातारा येथील सरकारी रुग्णालयात सध्या उपचार घेत आहे. मुलगा परदेशात, पत्नी रुग्णालयात आणि मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानात अशी नाजूक परिस्थिती असून त्यांच्या अंत्यविधीला कोणीच नातेवाईक आले नाहीत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाला मोठी धावाधाव करावी लागली. अंत्यविधीला मृतदेह नेण्यासाठी कोणतेही मंडळ शववाहिनी देईना. अनेक मंडळांनी आमच्याकडे वाहन आहे, मात्र चालक नाही ही सबब पुढे करून वाहन देण्यास नकार दिला. अखेर करंजेमधील अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळाने शववाहिनी दिली. मात्र, चालक जिल्हा आरोग्य कर्मचारी होता. हा मृतदेह शववाहिनीतून संगममाहूली येथे आणण्यात आला. याठिकाणी कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नगरपालिकेचे मुख्यधिकारी शंकर गोरे यांना धावाधाव करावी लागली. यावेळी प्रांतधिकारी हजर होते.

मृदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीच लाकडे देईना. अखेर अधिकाऱ्यांनी कुलूप तोडून कारवाई करावी लागेल असा इशारा दिला त्यानंतर त्यांना लाकडे मिळाली. लाकडे मिळाली पण रचणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला. शेवटी पालिकेचे मुख्याधिकारी, प्रांताधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांनीच सरण रचून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. सातारकरांनी माणुसकी न दाखवल्यामुळे आरोग्य यंत्रणेला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना हातातले काम बाजूला ठेवून अंत्यसंस्कार करावे लागले.