रात्री ATM मधून पैसे काढताय, SBI नं घेतलाय हा निर्णय, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एटीएममधून पैसे काढण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) या सुविधेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय भारतीय स्टेट बँकेने घेतला आहे. मंगळवारी बँकेने सांगिल्यानुसार ही सुविधा येत्या शुक्रवारपासून अहोरात्र उपलब्ध असणार आहे. त्यामुळे १० हजार रुपये व त्यापेक्षा अधिक रक्कम बँकेच्या एटीएममधून काढण्यासाठी ओटीपी आधारित सुविधा १८ तारखेपासून २४ तास उपलब्ध होणार आहे.

कोरोना संसर्ग दरम्यान सायबर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यातही आर्थिक गुन्हांचे प्रमाण वाढत आहे. त्या अनुषंगाने ग्राहकांचे आर्थिक गैरव्यवहारांपासून संरक्षण करणे, तसेच अनधिकृत व्यवहारावांवर वचक ठेवणे त्यासाठी बँकेने ओटीपी आधारित सुविधा चोवीस तास पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा वापरण्यासाठी स्टेट बँकेच्या ग्राहकांनी आपले मोबाइल क्रमांक बँकांकडे नोंदवावेत अथवा पूर्वीचे क्रमांक बदलले असतील, तर ते अद्ययावत करण्यात यावे, असे आवाहन बँकेने केलं आहे.

यापूर्वी स्टेट बँकेने १ जानेवारी २०२० रोजी ओटीपी आधारित एटीएम सेवा सकाळी ८ ते रात्री ८ अशी १२ तासांकरता सुरु केली होती. याबाबत बॅंकचे रिटेल व डिजिटल बँकिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सी. एस. शेट्टी म्हणाले, ही सुविधा अहोरात्र सुरु केल्याने एटीएममधील सुरक्षा यंत्रणाही अधिक प्रभावी केली जाणार आहे. ग्राहकांची सुरक्षितता आणि सोय पाहण्यासाठी बँक सातत्याने पुढाकार घेत असते. त्यासाठी नवनवे तंत्रज्ञान स्विकारुन विविध सुरक्षा उपाययोजना सुद्धा बँक वेळोवेळी करत असते.

अशी आहे ओटीपी आधारित एटीएम सुविधा

>> ही सुविधा केवळ स्टेट बँकेच्या डेबिट कार्डधारकांसाठी असून या मार्फत १० हजार रुपये व त्यापेक्षा अधिक रक्कम एटीएममधून काढता येणार आहे.

>> ही सुविधा केवळ स्टेट बँकेच्या एटीएममध्ये उपलब्ध असणार आहे.

>> पैसे काढण्यासाठी प्रत्येक वेळी ग्राहकाला डेबिट कार्डचा पिन क्रमांक टाकल्यावर ओटीपी सुद्धा टाकावा लागणार आहे. हा ओटीपी ग्राहकाच्या मोबाइलवर बँकेतर्फे पाठवला जाणार आहे.

>> एटीएम यंत्रात डेबिट कार्ड घालून पिन टाकल्यावर नेमकी किती रक्कम काढायची ते टाइप केल्यावर एटीएम यंत्राकडून तुम्हाला ओटीपीची मागणी केली जाईल.