पत्रकार सिद्दीकी कप्पनला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामिन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सर्वोच्च न्यायालयाने पत्रकार सिद्दीकी कप्पन यांना सशर्त जामिन मंजूर केला आहे. कप्पन यांनी आईची तब्बेत बरी नसल्याचे कारण देत जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, की जामिन काळात सिद्दीकी कप्पन पोलिस सुरक्षेत राहतील. न्यायालयाने त्यांना 5 दिवसांचा जामिन मंजूर केला आहे.

कप्पन सिद्दीकी यांना 5 दिवसांचा जामिन दिला गेल्याने त्यांना हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तुरूंगात जावे लागणार आहे. जामिनाच्या कालावधीत ते कोणालाही भेटू शकत नाहीत. त्यांना 24 तास पोलिसांच्या संरक्षणात राहावे लागणार आहे. तसेच त्यांना कोणत्याही मीडिया किंवा सोशल मीडियावर वक्तव्य करण्यावर बंदी असेल. पण ते कुटुंबातील सदस्य आणि डॉक्टरांची भेट घेऊ शकतील.

सिद्दीकी कप्पन यांना उत्तर प्रदेश पोलिसांच्या सुरक्षेत राहावे लागणार आहे. तर त्यासाठी केरळ पोलिसही सहकार्य करतील. सिद्दीकी यांना जामिन मिळावा, यासाठी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला.

काय आहे सिद्दीकी यांच्यावर आरोप?

उत्तर प्रदेश सरकारने न्यायालयात सांगितले, की पत्रकार सिद्दीकी यांच्यावर गंभीर आरोप आहेत. ते पीएफआय या संघटनेचे सक्रीय सदस्य आहेत. त्यामुळे पैशांसंबंधी व्यवहारांची चौकशी करायची आहे.. काही पोस्टरची चौकशीही करायची आहे, असे सांगितले.

5 ऑक्टोबरला अटक

सिद्दीकी कप्पन हे 5 ऑक्टोबर, 2020 मध्ये हाथरस येथे जात होते. त्यावेळी मथुरा पोलिसांनी त्यांना अटक केली. सिद्दीकी हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे सदस्य असल्याचा दावा मथुरा पोलिसांनी केला.