Corona Virus वर वैज्ञानिकांना मोठं ‘यश’, लवकरच तयार होऊ शकते ‘लस’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – चीनमध्ये कोरोनामुळे मरणार्‍यांची संख्या सतत वाढत आहे. तसेच चीनच्या वुहानमधून सुरू झालेला कोरोना व्हायरस आता जगातील 28 देशांत पसरला आहे. चीन बाहेरसुद्धा अनेक देशांमध्ये कोरोनामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच अमेरिकन वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरसची लस आणि उपचार शोधण्याच्या दिशेने महत्वपूर्ण यश मिळवले आहे. या वैज्ञानिकांनी कोरोनाचा 3-डी अटॉमिक स्केल मॅप तयार केला आहे.

अमेरिकेच्या यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास आणि नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थच्या वैज्ञानिकांना कोरोना व्हायरसबाबत शोधात मोठे यश मिळाले आहे. या वैज्ञानिकांना कोरोनावर लस शोधण्यात यश आले आहे. चीनच्या संशोधकांनी उपलब्ध केलेल्या व्हायरसच्या जेनेटिक कोडच्या मदतीने हे यश मिळाले आहे.

हे वैज्ञानिक हा अटॉमिक मॅप जगभरातील वैज्ञानिकांना उपलब्ध करून देतील, जेणेकरून यावर आणखी संशोधन करता येईल. वैज्ञानिकांना आशा आहे की, याच्या मदतीने इम्यून सिस्टमला व्हायरसशी लढणे शक्य होऊ शकते.

चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. तेथे दररोज मृतांचा आकडा वाढत चालला आहे. चीनमध्ये आतपर्यंत मरणार्‍यांची संख्या 2128 वर पोहचली आहे. आता आरोग्य कर्मचार्‍यांनासुद्धा कोरानाची लागण होऊ लागली आहे. कोरोना (कोविड-19) चे केंद्र असलेल्या वुहानमध्ये एका मोठ्या हॉस्पिटलच्या संचालकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. परंतु, दिलासादायक बाब ही आहे की, दररोज लागण होणार्‍या केससमध्ये आता घट झाली आहे.

स्पाइक प्रोटीनद्वारे तयार होऊ शकते लस

यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास आणि नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थच्या टीमने सर्वात आधी चीनच्या संशोधकांद्वारे उपलब्ध व्हायरसच्या जेनेटिक कोडचा अभ्यास केला. नंतर त्यांनी स्टेबलायजर सॅम्पल तयार केले, ज्यास स्पाइक प्रोटीन म्हटले जाते. टीमच्या सदस्यांनी कटिंग एज तंत्रज्ञानाद्वारे स्पाइक प्रोटीनची इमेज तयार केली आणि नंतर आपल्या शोधाचे निष्कर्ष सायन्स जरनलमध्ये प्रकाशित केले.