Pune News : लोहगाव परिसरातील उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटमधून 25 तोळे सोन्याचे दागिने चोरणारा सुरक्षारक्षक गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोहगाव येथील एका उच्चभ्रू सोसायटीत झालेल्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. सोसायटी मधील एका सदनिकेतून 25 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना 30 डिसेंबर रोजी घडली होती. विमानतळ पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी पूर्वी या सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता.

पोलिसांनी यापूर्वी तीन जाणांना अटक केली असून त्यांच्याकडून 10 लाख रुपये किमतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये एका सोनाराचा समावेश आहे. संतोष उर्फ लारा काशिनाथ जाधव (वय-35 रा. पोरवाल रोड, लोहगाव) याच्यासह त्याचा साथिदार संतोष उर्फ रॉकी अरुण धनवजीर (वय-34 रा. निंबाळकर नगर, लोहगाव), सोने खरेदी करणारा सोनार अशोक गणेशलाल जानी (वय-54 रा. शनिवार पेठ, सातारा) यांना अटक केली आहे. याप्रकरणी सौरभ कुंदन यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे 30 डिसेंबर 2020 रोजी कात्रज येथे वडीलांना भेटण्यासाठी कुटुंबियांसमवेत गेले होते. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाचे लॉक तोडून कपाटातून 25 तोळ्याचे दागिने चोरुन नेले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना अटक केली. रॉकी उर्फ लारा जाधव हा सोसायटीमध्ये पूर्वी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीचे सोने सोनार अशोक जानी याला विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

ही कारवाई पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्ष गजानन पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत गिरी, पोलीस कर्मचारी अविनाश शेवाळे, अशोक आटोळे, उमेश भेंडे, रमेश लोहकरे, विशाल गाडे, संजय आढारी, विनोद महाजन, सचिन भिंगारदिवे, नाना कर्चे, अरुण पठाण, राहुल मोरे, किरण अबदागिरे, वैभव खैरे, प्रशांत कापुरे यांच्या पथकाने केली.