रेल्वेचा सेक्शन इंजिनियरला लाच घेताना ‘या’ कारणासाठी दिले पकडून

श्रीगंगानगर : वृत्त संस्था – आपल्याकडे असलेल्या अधिकाराचा सरकारी अधिकारी कसे लाच घेण्यासाठी आणि सामान्यांना त्रास देण्यासाठी उपयोग करतात, याचा अनुभव राजस्थानमधील श्रीगंगानगरच्या अनुपगढ येथील शेतकऱ्याला आला. शेवटी त्याने थेट सीबीआयशी संपर्क साधून रेल्वेच्या सेक्शन इंजिनियरला लाच घेताना पकडून दिले.

शेतकऱ्याकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना सीबीआयने सेक्शन इंजिनियर आर एच मीना याला सापळा रचून रंगेहाथ पकडले. या शेतकऱ्याची मोठी जमीन होती. त्याच्या जमिनीतून रेल्वे लाईन गेल्याने त्याच्या जमिनीचे दोन तुकडे झाले. त्यामुळे या जमिनीला पाणी देण्यासाठी रेल्वे लाईनच्या खालून पाईप टाकण्याची परवानगी त्यांनी मागितली होती. त्यासाठी आवश्यक ती फी पण त्यांनी भरली होती. तरीही मीना त्यांना परवानगी देत नव्हते. परवानगीसाठी त्यांनी २८ हजार रुपयांची लाच मागितली.

जमीन त्यांची, पाईपही त्यांचे, त्यांच्याच जमिनीतून रेल्वे लाईन गेलेली, तरीही त्या दोन्ही जमिनीला पाणी देण्यासाठी लाच द्यावी लागत असल्याने परिवादी रणवीर सिंह यांनी सीबीआयशी संपर्क साधला. सीबीआयने त्यांच्या तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी मीना याने तडजोड करीत २५ हजार रुपये घेण्याचे मान्य केल्यानंतर कार्यालय सुटल्यानंतर अनुपमगढ येथे २५ हजार रुपयांची लाच घेताना सीबीआयने सापळा रचून त्याला पकडले.