ज्येष्ठ नाटककार शशिकांत कोनकर यांचे निधन

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाण्यातील ज्येष्ठ नाटककार, अर्थशास्त्राचे अभ्यासक आणि शिक्षक शशिकांत कोनकर यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ठाण्यातील विद्या विकास केंद्राचे ते एक संस्थापक होते. अर्थशास्त्राचे जाणकार आणि उत्तम अकाऊंटन्सी शिकवणारे शिक्षक म्हणून ते विद्यार्थ्याचे आवडते कोनकर सर होते. बँक ऑफ इंडियातील नोकरी, क्लासेसमध्ये शिकवणे आणि लेखन अशी तिहेरी कामगिरी ते एकाचवेळी करत होते.

सुमारे पन्नास बावन्न वर्षांपूर्वी शशिकांत कोनकर यांनी लिहिलेले ‘दोन घोडे अडिच घरात’ हे फार्सिकल नाटक व्यावसायिक रंगमंचावर आले होते. त्यानंतर या नाटककारची घोडदौड सुरू झाली.राज्य नाट्य स्पर्धेसाठी ‘खुनी पळाला काळजी नसावी’, ‘मृगजळावर एक सावली’, ‘पत्त्यात पत्ता’, ‘कलिकवच’अशी वेगवेगळ्या प्रकृतीची नाटके त्यांनी लिहीली. त्यानंतर ‘हनिमून एक्सप्रेस’ हे त्यांचे धम्माल विनोदी नाटक रंगमंचावर आले. राजा गोसावी आणि नयना आपटे या जोडीने ही एक्सप्रेस सुसाट पळवली.

कोनकरांच्या नाट्ययादीतील महत्वाचे नाटक म्हणजे ‘राजू तू खर सांग’.रवि पटवर्धन,शशि जोशी,सुधीर दळवी या संचातील या नाटकाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते.तसेच ‘लव्हगेम’‘इकडे व्हिलन तिकडे मिलन’‘बायकोचा खून कसा करावा’ ही नाटके ही त्यांनी लिहीली होती. त्यांनी लिहिलेल्या ‘उचक्या’ या एकपात्री कार्यक्रमाचे प्रयोग शशि जोशींनी अमेरिकेत केले होते. ठाणे महापालिकेच्या ‘ठाणे गुणिजन’ पुरस्काराने त्यांच्या लेखन कारकिदीर्चा गौरव झाला होता. मध्यप्रदेशातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला होता.