जमावाच्या दगडफेकीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी आवटे जखमी

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

कोपरखैरणे येथील बालाजी मल्टिप्लेक्समोरील सिडकोच्या भूखंडावरील बेकायदेशीर झोपडपट्टीवर कारवाई केल्यानंतर संतप्‍त जमावाने अतिक्रमण विरोधी पथकावर आणि पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांवर दगडफेक केल्याची घटना मंगळवारी घडली. यामध्ये कौपरखैरणे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी आवटे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

कौपरखैरणे परिसरातील वातावरण तणावपूर्ण आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. बेकायदेशीर झोपडयांवर कारवाईसाठी गेलेल्यांवर थेट दगडफेक झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. संतप्‍त जमावाच्या दगडफेकीनंतर तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिक्रमण विरोधी कारवाई थांबविण्यात आली आहे. पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा अवकाश असतानाच ही कारवाई करण्यात येत असल्याने झोपडपट्टीधारक आक्रमक झाले आहेत.

दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी अधिक कुमक मागवली होती. दगडफेकीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी आवटे जखमी झाल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्यावर उपचार चालू असून वरिष्ठ अधिकार्‍यांनी रूग्णालयात जावुन त्यांची भेट घेतली आहे.