खिशात जिवंत काडतुसे घेऊन संसदेत घुसण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली मध्ये मोठा हिंसाचार झाल्याची घटना ताजी असताना आता संसदेत घुसखोरी करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या इसमाकडे ३ जिवंत काडतुसे सापडली आहेत. हा इसम गेट क्रमांक ८ मधून संसदेत घुसण्याचाच प्रयत्त्न करीत होता. या इसमाचे नाव अख्तर खान असं आहे. ही घटना खळबळ माजवणारी आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दिल्लीतील संसद भवनाच्या गेट क्रमांक ८ मधून हा इसम आत जाण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा रक्षकांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात ३ जिवंत काडतुसे सापडली. याबाबत जाब विचारला असता त्याने प्रवेश कारण्यापूर्वी बाहेर ठेवण्यास विसरलो असा खुलासा केला. या इसमाला पोलिसांकडे स्वाधीन केले असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. हा इसम नेमकं कोणत्या कारणाने संसदेत आला होता. त्याचा काही घातपात करण्याचा इरादा होता का? याचा पोलीस कसून तपास करत आहेत

दिल्लीत CAA वरून अलीकडेच हिंसाचार उफाळून आला होता. त्यामुळे दिल्लीत प्रचंड सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून खूप मोठा बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्ली पोलीस डोळ्यात तेल घालून बंदोबस्त करत आहेत.

दिल्ली दंगलीच्या मुद्द्यावरून संसदेत गोंधळ
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान राजधानी दिल्लीतील दंगलीच्या मुद्द्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. संसदेचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे सभापतींना सभागृहाचे कामकाज सतत तहकूब करावे लागले. दरम्यान, लोकसभेत सभापतींकडून पत्र काढून घेतल्याप्रकरणी काँग्रेसच्या सात खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.